Sergio Gor On India-US Trade Deal : अमेरिका आणि भारतामधील व्यापार कराराची मागील काही महिन्यांपासून मोठी चर्चा सुरू होती. मात्र, काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेतील या बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची अंतरिम सहमती झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी तत्काळ लागू करण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भारत आणि अमेरिकेत आता आणखी एक मोठा व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिले आहेत. राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका एका मोठ्या खनिज व्यापार कराराची तयारी करत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

राजदूत सर्जियो गोर यांच्या खनिज कराराच्या संदर्भातील वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिका लवकरच खनिजांबाबतच्या कराराची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लवकरच एक महत्त्वपूर्ण खनिज व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याच्या जवळ असल्याचं सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे.

सर्जिओ गोर नेमकं काय म्हणाले?

भारत-अमेरिका व्यापार संबंधांना पुढे घेऊन जाण्यासाठी अपेक्षित असलेल्या यशस्वी कराराच्या प्रमुख धोरणात्मक गोष्टींवर बोलताना सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, “आमच्या देशांमधील सहकार्याच्या सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे खनिजे. या खनिजांसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळ्या, आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपरिहार्य आहेत. त्यामुळे मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की अमेरिका आणि भारत आज एक महत्त्वपूर्ण खनिज करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ आहेत, जो प्रगत उत्पादन, ऊर्जा प्रणाली आणि तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा साखळ्या सुनिश्चित करण्यास मदत करेल. पुढच्या काही महिन्यांत या कराराची घोषणा होण्याची अपेक्षा आहे”, असंही सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे.

“आम्ही भारताबरोबर चीनसारखी चूक करणार नाही”, अमेरिकेच्या मंत्र्यांचं वक्तव्य चर्चेत

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर नुकतंच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री ख्रिस्तोफर लँडौ यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. भारत आणि अमेरिका व्यापार करारामध्ये अमेरिका आपलं राष्ट्रीय हीत प्रथम ठेवणार असल्याचं ख्रिस्तोफर लँडौ यांनी म्हटलं होतं. तसेच २० वर्षांपूर्वी आम्ही चीन संदर्भात केलेल्या चुका आता भारतासोबत होऊ देणार नाही. कारण अमेरिकेने तेव्हा आपल्या बाजारपेठा खुल्या केल्या होत्या आणि त्यानंतर विविध क्षेत्रांत चीनने अमेरिकेला मागे टाकलं’, असं ख्रिस्तोफर लँडौ यांनी म्हटलं होतं.

ख्रिस्तोफर लँडौ यांनी असंही म्हटलं होतं की, “अमेरिका भारताबरोबरच्या व्यापार करारामध्ये ‘अमेरिका फर्स्ट’ हेच धोरण अवलंबवणार आहे. भारताबरोबर आर्थिक संबंध आणि व्यापार वाढवताना अमेरिका स्वत:च्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल आणि दोन दशकांपूर्वी केलेल्या चुका टाळेल.”