US-Israel Iran War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्याने कच्च्या तेलाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा देणार असल्याची घोषणा केली होती. पण या घोषणेच्या काही दिवसांतच आता अमेरिकेने यू-टर्न घेतल्याचं चित्र दिसत आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवण्याच्या मुद्यांवर आता अमेरिकेचे ऊर्जा मंत्री ख्रिस राईट यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘सध्या अमेरिकेच्या लष्कराचं पहिलं टार्गेट इराणची लष्करी शक्ती आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांना कमकुवत करणं हेच आहे. त्यामुळे तेलवाहू जहाजांना लष्करी संरक्षण देणं सध्या शक्य नाही’, असं मंत्री ख्रिस राईट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेने यू-टर्न घेतल्याचं दिसत असून होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांची सुरक्षा धोक्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेचे ऊर्जा मंत्री ख्रिस राईट यांनी म्हटलं की, “अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा देण्यास तयार नाही. हे तुलनेने लवकरच होईल, पण आत्ता ते शक्य नाही. कारण सध्या आम्ही आमची सर्व लष्करी ताकद इराणच्या आक्रमक क्षमता आणि त्यांच्या उत्पादन उद्योगाला नष्ट करण्यावर केंद्रित करत आहोत. मात्र, पेंटागॉन भविष्यात सुरक्षा देण्याच्या ऑपरेशन्ससाठी सक्रियपणे तयारी करत आहे”, असं ख्रिस राईट यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अमेरिकन नौदल या महिन्याच्या अखेरीस तेलवाहू जहाजांना सुरक्षा देण्यास सुरूवात करू शकेल का? या प्रश्नाचं उत्त देताना ख्रिस राईट यांनी म्हटलं की, “बऱ्याचदा हो.” दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे कबूल केलं की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यावसायिक तेलाच्या जहाजांना तात्काळ तरी अमेरिका सुरक्षा देण्यास तयार नाही.

“इराणवर हल्ला करण्यासाठी काही शिल्लक नाही”, ट्रम्प यांचे युद्ध संपवण्याचे संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की इराणला लक्ष्य करण्यासाठी आता प्रत्यक्षात काहीही शिल्लक नाही आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार व्यत्ययांमुळे कच्चे तेल आणि वायूच्या वाढत्या किंमतींच्या चिंतेमुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध लवकरच संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणशी सुरु असलेलं युद्ध लवकरच संपेल. कारण आता इराणमध्ये लक्ष्य करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या काहीही शिल्लक नाही. थोडं फार काही शिल्लक असेल. त्यामुळे मी जेव्हा हे युद्ध संपवेल तेव्हा ते संपेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे युद्ध संपवण्याचे संकेत दिले असले तरी इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी मात्र युद्ध सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी बुधवारी म्हटलं की, “हे युद्ध कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय आणि आवश्यकतेनुसार जोपर्यंत आमचं सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही आणि ही मोहीम निर्णायकपणे जिंकत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील.”