scorecardresearch

“…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या तुकडीला घेऊन ३० ऑगस्ट रोजी शेवटच्या सी-१७ विमानाने काबूल विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर २४ तासांमध्येच बायडेन यांनी अमेरिकेला संबोधित केलं.

United States President Joe Biden
बायडेन यांनी देशाला संबोधित केलं.

अफगाणिस्तानमधून अमेरिकने माघार घेताना झालेला संघर्ष आणि त्यावरुन झालेल्या टीकेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून उत्तर दिलं आहे. अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या तुकडीला घेऊन ३० ऑगस्ट रोजी शेवटच्या सी-१७ विमानाने काबूल विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर २४ तासांमध्येच बायडेन यांनी अमेरिकेला संबोधित केलं. अमेरिकन इतिहासामध्ये सर्वाधिक काळ चाललेल्या या युद्धामधून माघार घेण्याचा आपला निर्णय कशापद्धतीने योग्य आहे हे बायडेन यांनी आपल्या भाषणात अनेकदा अधोरेखित केलं. विशेष म्हणजे या भाषणामध्ये बायडेन यांनी चीन आणि रशियाचा थेट उल्लेख करुन त्यांच्यासोबतच्या संघर्षाबद्दलही वक्तव्य केलं आहे.

भारतीय वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री देशाला संबोधित करताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, “माझ्या मते हा योग्य, हुशारीने घेतलेला आणि सर्वोत्तम निर्णय आहे. अफगाणिस्तानमध्ये आता युद्ध संपलं आहे. युद्ध संपण्यासंदर्भातील मुद्द्यांना तोंड देणारा मी अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष आहे. मी हे युद्ध संपवेल असा शब्द अमेरिकन नागरिकांना दिला होता. मी दिलेल्या शब्दाचा सन्मान केला,” असं म्हटलं. तसेच व्हाइट हाऊसमधून दिलेल्या या भाषणामध्ये बायडेन यांनी, “मी हे युद्ध सतत सुरु ठेवण्याच्या विचारात नव्हतोच,” असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

मी या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे. लोकांचं म्हणणं आहे की हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र मी याच्याशी सहमत नाही कारण आधी हे केलं असतं तर अराजकता निर्माण झाली असती आणि त्या देशामध्ये गृहयुद्ध सुरु झालं असतं. अशावेळेस संकटांचा सामना न करता आणि धोका पत्करुन तेथून निघता आलं नसतं, असंही बायडेन म्हणाले. “अफगाणिस्तानसंदर्भातील हा निर्णय केवळ त्या देशापुरता मर्यादित नव्हता. हा निर्णय म्हणजे लष्करी मोहिमांचं एक युग संपुष्टात आणण्यासारखं आहे,” असं बायडेन यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे काम केलं आहे ते विसरता येणार नाही असंही बायडेन म्हणाले.

नक्की वाचा >> तालिबानला एकाकी झुंजणाऱ्या सालेह यांचा अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकेला टोमणा; म्हणाले, “सुपर पॉवर म्हणवणाऱ्यांनी…”

बायडेन यांनी, “अमेरिकेचं हित हे अधिक महत्वाचं होतं म्हणूनच आमच्याकडे काबूल सोडण्याशिवाय काही पर्याय शिल्लक नव्हता,” असंही या भाषणादरम्यान म्हटलं आहे. आम्ही अमेरिकेचं हित लक्षात घेत काबूल सोडलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी केला जाऊ नये, असंही बायडेन म्हणाले आहेत. जागतिक संबंधांबद्दल बोलताना बायडेन यांनी चीन आणि रशियाचा उल्लेख केला. “आपण चीनकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांचा सामना करत आहोत, रशियासुद्धा आपल्याला आव्हान देत आहे. आपल्याला अफगाणिस्तानमध्ये त्यांच्याशी संघर्ष करायचा नव्हता. आपण नवीन मार्गांनी पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहोत. आपलं परराष्ट्र धोरण हे देशाच्या हितामध्ये हवं,” असंही बायडेन यांनी जागतिक स्तरावर या निर्णयाकडे कसं पाहिलं जाईल याबद्दल बोलताना सांगितलं.

नक्की पाहा >> Video: अमेरिकेच्या लष्कराने देश सोडताच तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून केलं उड्डाण

नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमधून माघार घेतली असली तरी आम्ही कायमच अफगाणिस्तानमधील जनता आणि त्यांच्या अधिकारांसाठी तसेच मानवाधिकारांसाठी लढत राहणार आहोत. २० वर्ष चाललेली ही लढाई फार आव्हानात्मक होती. हे अमेरिकेसाठी फार महागडं युद्ध ठरलं, असंही बायडेन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2021 at 07:48 IST

संबंधित बातम्या