Pete Hegseth On US-Israel-Iran War Updates : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाला १५ दिवस उलटले आहेत. पण अद्यापही हे युद्ध सुरू असून दररोज अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच इराणच्या काही प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबत नाहीये.

या युद्धामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध कधी संपणार? याबाबत सवाल विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

इराणमधील हे युद्ध कधी संपेल? याबाबत भाष्य करताना पीट हेगसेथ यांनी म्हटलं की,’जोपर्यंत अमेरिकेची उद्दिष्ट्ये साध्य होत नाहीत, तोपर्यंत अमेरिका आपली ही मोहीम सुरूच ठेवेल.’ तसेच अमेरिका आज इराणवर सर्वात मोठा हल्ला करणार असल्याचे संकेतही पीट हेगसेथ यांनी दिले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पीट हेगसेथ नेमकं काय म्हणाले?

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणला पुन्हा एकदा सर्वात मोठ्या हल्ल्यांचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा दिला. पीट हेगसेथ म्हणाले की, “सध्या सुरू असलेलं आखाती युद्ध अमेरिकेच्या अटींवरच संपेल आणि अमेरिका आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. इराणमधील अमेरिकेची उद्दिष्ट्ये पहिल्या दिवसापासून अपरिवर्तित आहेत आणि योजनेनुसार आहेत. या उद्दिष्टांमध्ये क्षेपणास्त्र नष्ट करणं, इराणचा संरक्षण औद्योगिक तळ मोडून काढणं, इराणच्या नौदलाला निष्प्रभ करणं आणि इराणला कधीही अणुशस्त्र मिळू नये हे सुनिश्चित करणं याचा समावेश आहे”, असं पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी पुढे म्हटलं की, “अमेरिकेच्या लष्कराने आतापर्यंत इराणमधील ७००० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. आता गुरुवारी आतापर्यंतचा सर्वात मोठ्या हल्ल्यांचा टप्पा पार पडेल. आमची क्षमता सतत वाढत आहे, तर इराणची क्षमता कमी होत आहे. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा निष्प्रभ करण्यात आली आहे. संघर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकी सैन्यावर होणारे इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि एकतर्फी ड्रोन हल्ले ९० टक्क्यांनी कमी झाले आहेत. नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्याच्या इराणच्या क्षमतेला सर्वात मोठा फटका बसला. अमेरिकेने इराणची किमान १२० नौदल जहाजं खराब केली आहेत आणि काही जहाजं बुडवली आहेत. इराणच्या ११ पाणबुड्या नष्ट केल्या आहेत. मात्र, तरीही जोपर्यंत अमेरिकेची उद्दिष्ट्ये साध्य होत नाहीत तोपर्यंत अमेरिका आपली ही मोहीम सुरूच ठेवेल”, असं पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केलं आहे.