अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्रिपक्षीय सुरक्षा आघाडीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या वर्चुअल चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अमेरिका अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे तंत्रज्ञान हे ऑस्ट्रेलियला देणार आहे. यामुळे भविष्यात या पाणबुड्यांच्या माध्यमातून दक्षिण आशिया परिसरातील समुद्रात आणि पॅसिफिक समुद्रात दीर्घकाळ गस्त घालणे, चीनला शह देणे शक्य होणार आहे. चीनचे वाढते नौदल सामर्थ्य लक्षात घेता अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आधी 1957 ला सोव्हिएत रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने इंग्लंडला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे तंत्रज्ञान बहाल केले होते.

अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या या ऑस्ट्रेलियात ऍडलेड इथे बांधल्या जाणार आहेत. यापुढील 18 महिन्यात अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांची संख्या, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ याबाबद्दलचा अहवाल तयार केला जाणार आहे. असं असलं तरी नेमक्या किती अणू पाणबुड्या बांधल्या जाणार, कधीपर्यंत सेवेत दाखल होणार हे स्पष्ट झालेले नाही. अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांबरोबर संरक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे भरघोस असे तांत्रिक सहाय्य अमेरिका आणि इंग्लंड देश हे ऑस्ट्रेलियाला करणार आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियात उद्योग क्षेत्राला तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास त्रिपक्षीय सुरक्षा आघाडीची घोषणा करतांना व्यक्त करण्यात आला.