अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर संघर्ष थांबला असून जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. मात्र सगळं सकारात्मक नाही, हे सांगणारे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण पुन्हा सुरू झालं असून पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांमध्ये तालिबानच्या येण्याने एक पडदा निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये वर्गात पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये एक पडदा असल्याचं दिसून येतंय.

खासगी अफगाणी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या स्त्रियांनी अबायाचा झगा आणि चेहऱ्याचा बहुतेक भाग झाकणे आणि निकाब घालणे आवश्यक आहे, असे आदेश तालिबानने सत्तेत आल्यानंतर दिले होते. तसेच वर्ग लैंगिकतेनुसार वेगवेगळे केले पाहिजेत किंवा पडद्याने विभागले गेले पाहिजे, असेही म्हटले होते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये बुरखा आणि निकाब घालण्याचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र, तालिबानच्या येण्याने ते लहान गावांसहित शहरांमध्ये पुन्हा दिसू लागले आहेत.

तालिबानच्या शिक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या एका आदेशात म्हटलंय की, “महिला विद्यार्थ्यांना फक्त महिलांनीच शिकवावं. परंतु जर ते शक्य नसेल तर चांगली वर्तणूक असलेले वृद्ध पुरूष या महिलांना शिकवू शकतात. विद्यापीठांनी महिला विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे महिला शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. जर महिला शिक्षकांची नेमणूक करणे शक्य नसेल, तर महाविद्यालयांनी आतापर्यंत चांगली वर्तणूक राहिलेल्या वृद्ध पुरुष शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, यासंदर्भात एएफपीने वृत्त दिले होते.

दरम्यान, स्त्रियांना वेगळं राहून अभ्यास करावा लागत असताना, त्यांनी पुरुषांसोबत बाहेर जाऊ नये, यासाठी त्यांना शिकवणं पाच मिनिटांपूर्वीच थांबवण्यात यावं. तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार, पुरुष विद्यार्थी जोपर्यंत इमारत सोडून जातपर्यंत महिलांना वेटिंग रुममध्ये थांबावे लागेल. दरम्यान, “ही योजना व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. आमच्याकडे मुलींना वेगळे करण्यासाठी पुरेसे महिला शिक्षक किंवा वर्ग नाहीत. परंतु ते मुलींना शाळा आणि विद्यापीठांमध्ये शिकायला जाण्यास परवानगी देत आहेत, ही गोष्ट सकारात्मक आहे,” असे विद्यापीठातील प्राध्यापक म्हणाले.