Lashkar E Taiba Rizwan Hanif Viral Video: पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असलेल्या रिझवान हनीफचा एक व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये बोलत असताना रिझवान हनीफने कबुली दिली की, गेल्या तीन ते चार वर्षात भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या मारेकऱ्याने केलेल्या गोळीबारात किमान ३० सहकारी आपण गमावले आहेत. दहशतवादी संघटनेच्या एखाद्या अतिरेक्याने त्यांच्या नुकसानाची माहिती जाहीरपणे बोलून दाखविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

‘भारतीय एजंट्सनी आमचे सहकारी मारले’

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सदर व्हिडीओ मे महिन्यातील असल्याचा दावा केला जात असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिझवान हनीफ जमावासमोर बोलताना दिसून येतो. तो म्हणतो, “भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी स्वतंत्र काश्मीरमध्ये आम्हाला शांततेत राहू दिले नाही. आपल्या एजंट्सच्या साहाय्याने त्यांनी आमच्या लोकांना शहीद केले. पेशावर, कराची, रावळपिंडी, रावलकोट आणि मुझफ्फराबाद येथे आमच्या सहकाऱ्यांवर हल्ले केले गेले.”

३० हून अधिक अतिरेकी ठार

रिझवान हनीफ आपल्या भाषणात पुढे म्हणतो, “गेल्या तीन ते चार वर्षांत भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या एजंट्सनी आमचे ३० सहकारी ठार केले आहेत.” गेल्या काही वर्षांत दहशतवादी संघटनांची मोठी हानी झाल्याची कबुली हनीफच्या भाषणामुळे पहिल्यांदाच मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत संपूर्ण पाकिस्तानमध्ये अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांचे अतिरेकी मारले गेले आहेत. या हल्ल्यांमागे कोण आहे? याची नेमकी कल्पना नाही.

पाकिस्तान मात्र या हल्ल्यांना भारत जबाबदार असल्याचा सांगत आला आहे. मात्र भारताने हे दावे अनेकदा फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानचे पितळ उघडे

लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना अवैध असून पाकिस्तानच्या भूमीवर तिचे आता अस्तित्व उरले नाही, असा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र रिझवान हनीफचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसह अनेक कारवायांमध्ये या संघटनेचा हात होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिझवान हनीफने भारताविरोधात चिथावणीखोर विधान केल्याचेही सांगितले जाते.

‘धुरंधर’चा संदर्भ?

काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटात अशाच प्रकारचे कथानक दाखवले गेले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे एजंट्स पाकिस्तानात ज्याप्रकारे अतिरेक्यांना संपवतात, त्याचप्रकारचा दावा रिझवान हनीफच्या भाषणातून केला जात आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात लष्कर-ए-तय्यबाचे अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. यात जहूर मिस्त्री, रियाज अहमद, ख्वाजा शाहिद, अबू सैफुल्लाह खालिद आणि बिलाल आरिफ सलाफी यांच्या नावाचा समावेश आहे.