बर्ड फ्लू आल्यानंतर कोंबडय़ा मारून टाकल्या जातात हे आपण ऐकले आहे, पण ऑस्ट्रेलियन सरकारने मूळ शिकारी मांजरींची प्रजाती टिकवण्यासाठी इतर २ कोटी मांजरी २०२० पर्यंत मारून टाकण्याचे ठरवले आहे. शिकारी मांजरी नामशेष होत आहेत म्हणून हा अघोरी उपाय योजला जात आहे.
आयुक्त ग्रेगरी अँड्रय़ूज यांनी सांगितले, की पर्यावरणमंत्री ग्रेग हंट यांनी वन्य मांजरीविरोधात उपाययोजना करण्यास सांगितले आहे. मेलबर्न प्राणिसंग्रहालयात त्यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियन प्रजातीच्या मांजरींना वाचवण्यासाठी आता या वन्य मांजरींना पाच वर्षांत ठार करण्यात येणार आहे. यापुढे मूळ ऑस्ट्रेलियन प्रजातीच्या मांजरी नष्ट होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांनी वन्य मांजरींची यादीच करण्याचे कबूल केले आहे. मांजरी मारण्यासाठी सरकार मोठा निधी देणार असून, या मांजरींना कमी वेदनादायी पद्धतीने मारण्याचा विचार आहे. इ.स २०२० पर्यंत २ कोटी मांजरींचे शिरकाण करण्याचे आपले उद्दिष्ट असून, पाच नवी बेटे व इतर १० भागांत ही कारवाई केली जाणार आहे. एक कोटी हेक्टर क्षेत्र या मांजरींपासून मुक्त केले जाईल. या मांजरी दोनशे वर्षांपूर्वी युरोपीय वसाहतवाद्यांनी येथे आणल्यानंतर त्यांचे प्रजनन वाढून संख्याही वाढली. त्या आता ऑस्ट्रेलिया खंड व न्यूझीलंडमध्ये पसरल्या आहेत. या मांजरी मूळ प्रजातीच्या ७.५ कोटी मांजरींना रोज मारतात, अशी माहिती आहे.