Gwalior High Court : देशभरातील विविध न्यायालयात दररोज वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी पार पडत असते. यामध्ये वेगवेगळ्या खटल्यांचा समावेश असतो. आता अशाच एका खटल्यावर सुणावणी दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. पती-पत्नीमध्ये अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही, असा निकाल ग्वाल्हेर हायकोर्टाने दिला आहे.
लैंगिक अत्याचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी एक याचिका एका व्यक्तीने ग्वाल्हेर हायकोर्टात केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ग्वाल्हेर हायकोर्टाने ही याचिका रद्द केली. तसेच यावेळी ग्वाल्हेर हायकोर्टाने महत्वाची टिप्पणी देखील केली.
या याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने म्हटलं की,’कायद्यातील तरतुदींनुसार दिलेल्या अपवादांच्या संदर्भात पतीने आपल्या सज्ञान पत्नीसोबत केलेला कोणताही लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृत्य हे बलात्कार ठरत नाही’ असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. या संदर्भातील वृत्त ‘लाइव्ह लॉ’ने दिलं आहे.
हायकोर्टाने असंही म्हटलं की, ‘पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंधांसाठी पतीवर खटला चालवता येणार नाही. यावेळी हायकोर्टाने म्हटलं की, तक्रारदाराने केलेले जबरदस्तीच्या अनैसर्गिक कृत्यांचे आरोप मान्य जरी केले तरी ती कृत्ये वैवाहिक संबंधांमधील आहेत. त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ च्या अपवाद २ नुसार, पतीने आपल्या पत्नीसोबत (जी अल्पवयीन नाही) केलेले लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृत्य हे बलात्कार ठरत नाही’, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे.
या प्रकरणात हायकोर्टाने असंही म्हटलं की, या एफआयआरमध्ये कोणत्याही विशिष्ट उघड कृत्याचा उल्लेख न करता केवळ सामान्य आणि सर्वसमावेशक आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पतीवर लावलेले आरोप रद्द करण्यात येत आहेत. तसेच नणंदेविरुद्धही लावण्यात आलेले आरोप अस्पष्ट असल्यामुळे तिच्यावरील कायदेशीर कारवाईही थांबवण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
