भूक निर्देशांक ठरविण्याची पद्धत अशास्त्रीय ! जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान खालावल्यानंतर केंद्र सरकारचा दावा

२०२१ सालच्या जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) ११६ देशांच्या यादीत भारताची १०१व्या क्रमांकावर घसरण झाली.

नवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रम कमी करणे धक्कादायक असल्याचे सांगतानाच, या निर्देशांकाच्या क्रमवारीसाठी वापरली जाणारी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे मत केंद्र सरकारने शुक्रवारी व्यक्त केले.

२०२१ सालच्या जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) ११६ देशांच्या यादीत भारताची १०१व्या क्रमांकावर घसरण झाली. २०२० साली भारत ९४व्या क्रमांकावर होता. आता तो या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या आपल्या शेजाऱ्यांच्या मागे आहे.

कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत एफएओच्या अनुमानाच्या आधारे जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताचा क्रम खाली येणे ‘धक्कादायक’ आहे. हा अहवालाचा वस्तुस्थितीशी संबंध नाही. त्यात कार्यपद्धतीच्या गंभीर चुका आहेत, असे या अहवालावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला व बाल विकास मंत्रालयाने सांगितले. ‘एफएओ’ने वापरलेली पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘गॅलप’ने दूरध्वनीद्वारे केलेल्या चार प्रश्नांच्या जनमत चाचणीच्या निकालांवर हे मूल्यांकन करण्यात आले आहे. दरडोई अन्नधान्याच्या उपलब्धतेवर आधारित कुपोषणाचे मोजमाप करण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही. कुपोषणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यासाठी वजन आणि उंचीच्या मोजमापाची आवश्यकता असते, असेही महिला व बाल विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सदोष अहवाल

’जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित करणाऱ्या कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेल्ट हंगरलाईफ यांनी अहवालाच्या प्रसिद्धीपूर्वी आपले काम योग्य पद्धतीने केले नाही, असे महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  

’करोना संकटाच्या काळात सरकारने सर्वासाठी अन्नसुरक्षेचे मोठे प्रयत्न केले. त्याचा पडताळा घेणारी आकडेवारीही उपलब्ध आहे, परंतु त्याकडे हा अहवाल पूर्णपणे दुर्लक्ष करतो, याकडे केंद्राने लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unscientific methodology used to calculate global hunger claims centre zws

ताज्या बातम्या