उत्तरप्रदेशातल्या कानपूरमध्ये झिका विषाणूची लागण झालेले १४ रुग्ण एकाच वेळी आढळून आले आहेत. या १४ जणांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. आता शहरातल्या झिका विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

कानपूरमध्ये सध्या झिका विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या आधी १ नोव्हेंबरला ६ रुग्ण आढळून आले होते. कानपूर शहरातल्या चकेरी भागात हे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा – आता डेंग्यूचं संकट? केंद्र सरकार सतर्क, ९ राज्यांमध्ये पाठवली विशेष पथकं!

झिका हा विषाणू एडीज एजिप्टी प्रजातीच्या डासामुळे पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एडीज डास दिवसा चावतात. याच डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. झिका हा सर्वसाधारणपणे जीवघेणा विषाणू नाही पण गर्भवतींसाठी तसंच भ्रूणासाठी हा विषाणू धोकादायक ठरू शकतो.

झिका विषाणूची अनेक लक्षणं ही डेंग्यूसारखीच असतात. मात्र हा विषाणू डेंग्यूपेक्षा अधिक धोकादायक आणि जीवघेणा ठरु शकतो. झिका विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासन आता सज्ज झालं आहे. रुग्णांचा इलाज काशीराम रुग्णालयात केला जात आहे. तिथे झिकाबाधित रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याशिवाय झिकाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन अनेक महत्त्वाची पावलं उचलत आहे.