उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनीती ठरवण्यात प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. परंतु, त्यांची ही रणनीती काँग्रेससाठी फायदेशीर ठरली नाही. मागील विधानसभेपेक्षाही यंदा त्यांना कमी जागा मिळाल्या. प्रशांत किशोर यांच्यावरून काँग्रेसमध्येही मतभेद होते. आता दारूण पराभवानंतर त्यांना उघड विरोध करण्यात येत आहे. बलिया जिल्ह्यातील एका काँग्रेसचे सचिव राजेश सिंह यांनी पक्ष कार्यालयाबाहेर पोस्टर लावले असून त्यात जो काणी प्रशांत किशोर यांना शोधून पक्ष कार्यकर्त्यांसमोर आणेल त्याला पाच लाख रूपये बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसने पाच राज्यातील निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांना रणनीती तयार करण्यासाठी नेमल होते. निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचा काहीच पत्ता नसल्याचे समजते. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर लावण्यात आल्याचे राजेश सिंह यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांच्याकडून पक्ष कार्यकर्त्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचे ते म्हणाले.
गत एक वर्षांपासून आम्ही खूप मेहनत घेतली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या सूचना ऐकल्या. आम्हाला वाटलं पक्षासाठी हे चांगले आहे. परंतु, आता आम्हाला उत्तर हवे आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी कार्यकर्त्यांना हे पोस्टर हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. निवडणुकीच्या पराभवासाठी कोणाला जबाबदार ठरवणे हे घाईचे ठरेल, असे राज बब्बर म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने गमावलेला जनाधार पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी एक योजना बनवली होती. लखनऊमध्ये त्यांनी वॉर रूम बनवली होती. त्यांच्या टीमने प्रत्येक बुथचा अभ्यास केला होता. तेथील जातीय आणि धार्मिक आकडेवारी तयार करून अशांना उमेदवारी देण्याबाबत सल्ला दिला होता. प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये ५०० लोक कार्यरत असल्याची चर्चा होती. परंतु, आसामप्रमाणेच त्यांची यूपीतही रणनीती अयशस्वी ठरली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी करण्यात प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका वठवल्याची चर्चा आहे.
११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस, समाजवादीच्या विरोधात गेले. या आघाडीला ५४ जागा मिळाल्या. उत्तराखंडमध्ये तर त्यांना फक्त ११ जागाच मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त पंजाबमध्येच सत्ता प्राप्त करण्यात यश आले. मणिपूर आणि गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना सरकार बनवण्यात यश आले नाही.