Uttar Pradesh Assembly Election 2027: दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग, मोदी सरकार आणि भाजपविरोधात दररोज विरोधी पक्ष आणि विविध संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. दुसऱ्या बाजूला, राजकीय पक्षांचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीकडेही वेधले गेले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष राजधानीत आंदोलन करताना दिसत असले तरी, दुसरीकडे त्यांची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. भाजपला मात्र तिसऱ्यांदा सत्ता काबीज करायची आहे. ‘मतचोरी’ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपसाठी जनतेचा पुन्हा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

समाजवादी पक्षाला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेले सामाजिक समीकरण विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर विस्तारायचे आहे. काँग्रेसला पुन्हा राज्याच्या राजकारणात स्वतंत्र राजकीय ताकद म्हणून उभे राहायचे आहे, तर बहुजन समाज पक्षाला आपल्या पारंपरिक दलित मतदारांना इतर पक्षांकडे जाण्यापासून रोखायचे आहे. त्यामुळे २०२७ची लढाई केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेश यादव अशी थेट नसेल. मतांची सामाजिक विभागणी आणि राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीचा कस लागणार आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणात महत्त्वाचा बदल घडवला. समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकत भाजपला मागे टाकले, तर काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या आघाडीने मिळून ४३ जागा जिंकल्या. दुसरीकडे, भाजपला ३३ जागांवर समाधान मानावे लागले. बसपला एकही जागा मिळाली नाही. या निकालातून उत्तर प्रदेशातील मतदारांची पारंपरिक राजकीय विभागणी पूर्वीप्रमाणे साचेबद्ध राहिलेली नाही, हे स्पष्ट झाले.

प्रामुख्याने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याच बदलाचा आधार घेत ‘पीडीए’चा प्रयोग पुढे नेला. मागास (पिछडा), दलित आणि अल्पसंख्याक या तीन सामाजिक समूहांना अखिलेश यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या ‘पीडीए’मुळेच समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचे मानले जाते. हाच प्रयोग आता विधानसभा निवडणुकीतही केला जाईल, असे दिसते. पारंपरिक यादव-मुस्लिम आधारावर अवलंबून न राहता गैर-यादव ओबीसी आणि दलित समाजाचा आधार वाढवण्याचे प्रयत्न समाजवादी पक्षाकडून सुरू आहेत.

भाजपच्या पारंपरिक प्रभावक्षेत्रातही दलित आणि मागास समाजाशी संपर्क वाढवण्यासाठी पक्षाने कार्यक्रम आखले आहेत. आग्रा आणि गोरखपूरसारख्या भागांत पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यामागेही ‘पीडीए’चा विस्तार हा उद्देश असल्याचे दिसते. पश्चिम उत्तर प्रदेशातील दलित समाजावर समाजवादी पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. आग्रा येथे दलित संमेलन आयोजित केले जात आहे. समाजवादी पक्षाचा हा सामाजिक विस्तार भाजपसाठी आव्हान निर्माण करू शकतो.

भाजपची रणनीती केवळ हिंदुत्व आणि सरकारच्या कामगिरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. २०२४नंतर संघटनेतील त्रुटी शोधणे, बूथ पातळीवर पुन्हा पकड मजबूत करणे आणि गैर-यादव ओबीसी, अतिमागास तसेच इतर सामाजिक समूहांशी असलेले राजकीय संबंध वाढवणे आदी बाबींवर भाजपने भर दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची विकासकामे आणि कायदा-सुव्यवस्थेतील कथित सुधारणा हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख आधार ठरू शकतात.

२०१७ आणि २०२२मध्ये हिंदुत्व, राष्ट्रवाद, कायदा-सुव्यवस्था आणि विकास या मुद्द्यांना मोठे महत्त्व होते. २०२४नंतर सामाजिक प्रतिनिधित्व, संविधान, आरक्षण आणि मतदारयादी यांसारखे मुद्देही विरोधकांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. आता २०२७साठी या मुद्द्यांची सांगड जातीय-सामाजिक समीकरणांशी घातली जात आहे. भाजपच्या दृष्टीने व्यापक सामाजिक आघाडी टिकवणे हे मोठे आव्हान असेल.

अपना दल, निषाद पक्ष, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांसारख्या छोट्या प्रादेशिक पक्षांचा त्यांच्या-त्यांच्या सामाजिक समूहांमध्ये प्रभाव आहे. हे पक्ष एनडीएचे घटक आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे मित्रपक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. राज्यसभेच्या दहा जागांपैकी आठ जागांवर भाजपने उभे केलेले उमेदवार ओबीसी, दलित, ब्राह्मण-ठाकूर आदी जातसमूहांचे समीकरण साधणारे आहेत. भाजपची जिंकण्याची रणनीती योगी सरकारची विकासकामे, कथित ‘गुंडाराज’वर नियंत्रण, उच्चवर्णीय-बिगर यादव ओबीसी-बिगर जाटव दलित हे सामाजिक समीकरण आणि अर्थातच हिंदुत्व, अशा चार प्रमुख मुद्द्यांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने मात्र उत्तर प्रदेशातील रणनीती बदलल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अजय राय यांच्या जागी आराधना मिश्रा ‘मोना’ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आणि सहारनपूरचे खासदार इमरान मसूद यांना कार्यकारी अध्यक्षपद देणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. तीन वेळा आमदार राहिलेल्या आराधना मिश्रा यांचे ब्राह्मण समाजातील प्रतिनिधित्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील इमरान मसूद यांचे मुस्लिम समाजातील राजकीय स्थान या दोन नियुक्त्यांमधून काँग्रेसने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबत देवेंद्र निषाद आणि आलोक प्रसाद यांना महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ब्राह्मण, मुस्लिम, ओबीसी आणि दलित या सामाजिक घटकांना महत्त्व देण्यात आल्याचे या फेरबदलातून दिसते.

या माध्यमातून काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या ‘पीडीए’ राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मात्र, काँग्रेसची संघटना उत्तर प्रदेशात अद्याप मजबूत नाही. त्यामुळे सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न झाला असला तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या जातसमूहांच्या पाठिंब्याचे मतांमध्ये रूपांतर करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष आराधना मिश्रा यांनी सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघांचा स्वतंत्र आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीला फायदा झाला असला तरी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसने किमान १५० जागांवर लढण्याची भूमिका मांडली आहे. जागावाटपासाठी एकमेकांवर दबाव आणण्याचा नेहमीचा खेळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून सुरू आहे. त्यामुळे या पक्षांचे काही नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. रायबरेली आणि अमेठी या दोन लोकसभा मतदारसंघांतील सर्व विधानसभा मतदारसंघ आपल्याला द्यावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. उमेदवारी निश्चित करण्याच्या टप्प्यावर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या स्तरावर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत २०२७च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा समाजवादी पक्षाशी केलेला तडजोडीचा भाग असल्याचे मानले जाते. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात उतरण्याची शक्यता आहे.

मायावतींच्या बहुजन समाज पक्षासमोर वेगळे आव्हान आहे. २०२४मध्ये एकही लोकसभा जागा न मिळाल्याने मायावतींना आपला पारंपरिक दलित आधार पुन्हा संघटित करावा लागत आहे. समाजवादी पक्ष दलित मतदारांना ‘पीडीए’च्या माध्यमातून आकर्षित करीत आहे, तर काँग्रेसही दलित नेतृत्वाला संघटनेत स्थान देत आहे. भाजपनेही दलित आणि अतिमागास समाजातील सामाजिक संपर्क मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे बसपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

बसपनेही एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आले; मात्र त्याला बसपने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बसप अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा करून देत असल्याची चर्चा आहे.

२०२७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता पक्ष किती जागा जिंकेल, हा नसून दलित आणि गैर-यादव ओबीसी मतांचे विभाजन कोणत्या पद्धतीने होईल, हाच असेल. यादव मतांवर समाजवादी पक्षाचा पारंपरिक प्रभाव आहे, तर भाजपने गेल्या दशकात गैर-यादव ओबीसींमध्ये आपले राजकीय स्थान निर्माण केले आहे. आता दोन्ही बाजू या समीकरणात दलित आणि अतिमागास घटक जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

समाजवादी पक्षाला यादव-मुस्लिम मतांच्या पलीकडे ‘पीडीए’चा विस्तार करायचा आहे. काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या आघाडीचा लाभ घेताना स्वतःची संघटना आणि सामाजिक आधार पुन्हा उभा करायचा आहे. भाजपला आपली व्यापक सामाजिक आघाडी कायम ठेवण्याबरोबरच २०२४च्या लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट भरून काढायची आहे. तर बसपला आपला पारंपरिक दलित मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

त्यामुळे उत्तर प्रदेशातील पुढील काही महिने हे केवळ प्रचाराचे नसून मतदारांच्या सामाजिक गटांची नव्याने जुळवाजुळव करण्याचे असतील. कोणता पक्ष कोणत्या सामाजिक समूहापर्यंत पोहोचतो, कोणत्या समूहाला आपल्या राजकीय प्रतिनिधित्वाची खात्री देतो आणि त्या सामाजिक संपर्काचे बूथवरील मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी किती मजबूत संघटना उभी करतो, यावर २०२७च्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.