उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने भारतीय लष्कराची हेरगिरी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील कासगंज येथील पटियाली येथून त्याला अटक केली आहे. शैलेश कुमार उर्फ शैलेंद्र सिंह चौहान असं या आरोपीचं नाव आहे. शैलेशने भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबूकद्वारे त्याने ही माहिती आयएसआयला दिली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी सध्या शैलेशची चौकशी करत आहेत.
आरोपी शैलेश कुमारने नऊ महिने अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्करात कंत्राटी मजूर म्हणून काम केलं होतं. तिथे काम करत असताना त्याने भारतीय लष्कर आणि संरक्षण यंत्रणेशी संबधित बरीच महत्त्वाची माहिती गोळा करून आयएसआयला दिली आहे. शैलेश भारतीय लष्करात कोणत्याही पदावर काम करत नाहीत. परंतु, त्याने त्याच्या ओळखीच्या प्रत्येकाला सांगितलं होतं की, तो भारतीय सैन्यदलात काम करतो.
शैलेशने फेसबूकसह इतर समाजमाध्यमांवर शैलेश चौहान या नावाने प्रोफाईल बनवली होती. प्रोफाईल फोटो म्हणून त्याचा भारतीय जवानाच्या गणवेशातील फोटो ठेवला होता. यादरम्यान, तो प्रीती नावाच्या एका हँडलरच्या संपर्कात आला. तसेच तो फेसबूकवर हरलीन कौर नावाच्या एका हँडलरच्या संपर्कात होता. या दोघी आयएसआयशी संबंधित आहेत. प्रीती आणि हरलीनशी शैलेशचं बोलणं सुरू होतं.
हे ही वाचा >> VIDEO : भिंतीला भगदाड पाडून चोर शोरूममध्ये घुसले, तब्बल २५ कोटींचे दागिने लंपास
शैलेश आयएसआयची हँडलर प्रीतीबरोबर व्हॉट्सअॅप कॉलवर बोलायचा. प्रीतीला त्याने सांगितलं होतं की तो भारतीय लष्करात सैनिक आहे. अनेक दिवस सोशल मीडियावर अश्लील गप्पा मारल्यानंतर प्रीतीने शैलेशला सांगितलं की, ती आयएसआयसाठी काम करते आणि शैलेशने जर तिची मदत केली तर ती त्याला भरपूर पैसे देईल. त्यानंतर शैलेशने प्रीतीला लष्कराशी संबंधित महत्त्वाच्या अस्थापना, त्यांची ठिकाणं, लष्कराची वाहनं, या वाहनांमधून कोणत्या वस्तूंची ने-आण केली जातेय याबाबतची काही माहिती दिली. तसेच त्याने या आयएसआय हँडलरला हवे होते ते फोटोदेखील पाठवले. शैलेशने आयएसआय हँडलरला माहिती आणि फोटो पाठवल्यानंतर तिने त्याला २,००० रुपये पाठवले, अशी कबुली शैलेशने दहशतवादविरोधीत पथकातील अधिकाऱ्यांना दिली.