उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा समोर आणला आहे. राम मंदिरचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावरून गेलेला नाही. रामाशिवाय विकास अशक्य असल्याचा दावा करत यासाठी पुन्हा आंदोलनाची गरज असल्याचे मत भाजप नेते विनय कटियार यांनी व्यक्त केले आहे.
आज तक या हिंदी वृत्त वाहिनीच्या पंचायत शो या कार्यक्रमात त्यांनी राम मंदिराच्या मुद्दाला पुन्हा हात घातला. राम मंदिर प्रश्नाबाबत आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. परंतु याला उशीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उकरला नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राम मंदिराकडे आमचे कधीच दुर्लक्ष झालेले नाही. पण न्यायालय याबाबत खूप उशीर करत आहे. जोपर्यंत एखादा मुद्दा समोर येत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू होणार नाही. यासाठी पुन्हा एकदा संघटना उभारावी लागेल मग आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आणि मोरारजी देसाई हेही राम मंदिर बनवण्याच्या बाजूचे होते, असा दावा ही त्यांनी या वेळी केला. नंदा यांनी तर हिंदू संमेलनात सहभाग नोंदवला होता. तर देसाई यांनी यासाठी पत्र ही लिहिले होते, असे सांगितले.
पंतप्रधानांच्या मताशी सहमत नाही
बहुतांश गो रक्षक हे समाजकंटक असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी म्हटले. ९५ टक्के गो भक्त हे गायीला आपली आई मानतात. ते गाईची पूजा ही करतात. हे खरं आहे की, गो शाळांची अवस्था तितकी चांगली नाही. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.