UP BJP MLA Jai Devi Kaushal faces caste discrimination: उत्तर प्रदेशातील लखनौच्या मलिहाबाद मतदारसंघात भाजपाच्या महिला आमदार जय देवी कौशल यांना जातीआधारीत भेदभावाचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. खुद्द जय देवी कौशल यांनीच यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर दावा केला आहे. याबाबत त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून याची तक्रार पक्षाध्यक्षांकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाच्याच आमदारांना जातीआधारीत भेदभावाचा सामना करावा लागल्याचं म्हणत विरोधकांकडून टीका केली जात आहे.
लखनौमध्ये नेमकं काय घडलं?
जय देवी कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिहाबाद मतदारसंघातील काकोरी भागातल्या शितलादेवी मंदिरात हा प्रकार घडला. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यकर्मादरम्यान, जय देवी कौशल यांना मंदिरात पूजाच करू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आपणच या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारकडून निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, जेव्हा मंदिरात पूजेची वेळ आली, तेव्हा आपल्याला पूजा करण्यापासून रोखलं गेलं, असा आरोप जय देवी कौशल यांनी केला आहे.
“आज तिथे माझा कार्यक्रम होता. मी त्यांना सांगितलं होतं की सकाळी आम्ही मंदिरात पूजा करू. आम्ही जेव्हा तिथे गेलो, तेव्हा तिथे सगळी व्यवस्था करण्यात आली होती. पण मला मंदिरात पूजा करण्यापासून रोखण्यात आली. पूजा करण्याच्या वेळी पुजारी म्हणाले सगळ्यांनी फक्त एकदा गिरकी मारा आणि सगळ्यांची आरती झाली असं समजा. पुजाऱ्यांनीच सगळी पूजा केली आणि माझ्याकडून काहीही करवून घेतलं गेलं नाही. भेदभाव करण्यात आला म्हणूनच पूजा करू दिली नाही. या प्रकरणाची तक्रार मी पक्षातील वरीष्ठांकडे करणार आहे”, अशी प्रतिक्रिया जय देवी कौशल यांनी एएनआयशी बोलताना दिली.
“मी पासी समाजाची आहे म्हणून…”
दरम्यान, आपण एका विशिष्ट जातीचे असल्यामुळेच आपला अपमान करण्यात आल्याचा दावाही जय देवी कौशल यांनी केला आहे. “यामागे जातीयताच कारण आहे. मी पासी समाजाची आहे. मी स्थानिक आमदार आहे. मीच त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर करून घेतला होता. माझ्याकडून पूजेतलं काहीतरी करवून घ्यायला हवं होतं. पण मी तिथे पूजा करायला गेले तर तिथे माझा अपमान करण्यात आला. माझ्याकडून साधी अगरबत्तीही लावून घेतली नाही”, असं त्या म्हणाल्या.
