उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची कारवाई
अयोध्या आणि मथुरेतील मंदिर बांधण्यासाठी मुस्लिमांनीच मदत करावी, असे वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते ओमपाल नेहरा यांचा राज्यमंत्रिपदाचा दर्जा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घेतला आहे.
नेहरा यांचा मंत्रिपदाचा दर्जा मुख्यमंत्र्यांनी कालच काढून घेतला आहे, असे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते कॅबिनेटमंत्री राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. अयोध्येतील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मंत्र्यांनी हे विधान केल्याने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष असलेल्या अखिलेश यादव यांनी ही कारवाई केली. अयोध्येत विश्व िहदू परिषदेने शिळा आणल्या असून, राममंदिर उभारण्याची तयारी चालवली असतानाच नेहरा यांनी हे चिथावणीखोर विधान करून वििहपच्या कारवायांना खतपाणी घातले होते. नेहरा यांनी २३ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात असे सांगितले, की मुस्लिमांनी अयोध्या व मथुरा येथील मंदिरे बांधण्यासाठी पुढे यावे म्हणजे विश्व िहदू परिषद व इतर संघटनांना ओळखच हरवून बसावे लागेल. बिजनोर येथे त्यांनी असेही सांगितले होते, की राममंदिर अयोध्येशिवाय कुठे होणार, तो भावनिक प्रश्न आहे. मथुरेत जेथे कृष्णाचे मंदिर आहे तेथे मशीद कशी असू शकते, मुस्लिमांनी याचा विचार करावा व करसेवेसाठी पुढे यावे व तेथे मंदिरे बांधण्यास मदत करावी, आम्ही विश्व हिंदू परिषदेत सापळय़ात अडकू इच्छित नाही.
नेहरा हे करमणूक कर विभागात राज्य सरकारचे सल्लागार होते व त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पद काढूनही नेहरा यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. मथुरा व अयोध्या येथे मंदिरे बांधावीत असे त्यांनी आज पुन्हा एकदा वार्ताहरांना सांगितले व मंदिरे बांधण्यात मुस्लिमांनी हिंदू बांधवांना मदत करावी अशी पुस्तीही जोडली. भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सांगितले, की या विधानाला काही अर्थ नाही, कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. काँग्रेस प्रवक्त्या रिटा बहुगुणा यांनी सांगितले, की नेहरा यांच्यावरील कारवाई योग्यच आहे, कारण ते समाजवादी पक्षाच्या विचारसरणीविरोधात बोलले आहेत.