उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तीन दिवसांमध्ये बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीवजा संदेश आदित्यनाथ यांना सोशल मीडियावर देण्यात आला आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

हेही वाचा- पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय मंत्र्यांची संपत्ती जाहीर; जाणून घ्या पंतप्रधान मोदींची संपत्ती किती वाढली

आरोपीचा शोध सुरू

उत्तर प्रदेशच्या मुख्यालयाच्या ११२ या व्हाॅटस्ॲप नंबरवर एक मेसेज आला होता. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा नंबर शाहिद खान नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. व्हाॅटस्ॲप नंबरच्या आधारे पोलीस आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी लखनऊच्या गोल्फ सिटी ठाण्यात आरोपी शाहिद खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- तेलंगणात भाजपा नेत्याचा घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? तपास सुरु

यापूर्वी मिळाल्या आहेत धमक्या

पोलिसांनी व्हाॅटस्ॲपवर आलेल्या या धमकीचा स्क्रीन शॉटही गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही त्यांना अशा प्रकारच्या अनेकदा धमक्या देण्यात आल्या होत्या.