बाईकवरून जाणाऱ्या एका तरुणीची ओढणी रस्त्यावर उभ्या काही तरुणांनी खेचल्यानं ती तरुणी खाली पडली व समोरून येणाऱ्या बाईकखाली आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये घडली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांची कानउघाडणी केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलावलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
नेमकी घटना काय?
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांना धारेवर धरलं. आंबेडकर नगरमध्ये काही पुरुषांनी एका तरुणीच्या गळ्यातली ओढणी खेचल्यानं ती रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बाईकच्या खाली ती आल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकारात सहभागी असणारे आरोपी शाहबाज व फैजल यांचा पाठलाग करून त्यांच्या पायावर गोळ्या झाडून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना सुनावलं
दरम्यान, याच घटनेवरून योगी आदित्यनाथ पोलिसांवर भडकले. सोमवारी संध्याकाळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत आंबेडकर नगरमध्ये घडलेल्या या घटनेवरून त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यामध्ये आंबेडकर नगरचे पोलीस अधीक्षक अजित सिन्हा यांचाही समावेश होता.
या घटनेबाबत अजित सिन्हा यांनी कारवाई करण्यात दाखवलेल्या दिरंगाईवर योगी आदित्यनाथ म्हणाले, “जर सरकारनं मध्ये पडून तुम्हाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले नसते, तर तुम्ही तर त्या आरोपींना मिठाईही खाऊ घातली असती. सरकारनं आदेश देईपर्यंत तुम्ही काय त्या आरोपींची आरती करत होतात का?” असा सवाल आदित्यनाथ यांनी केला आहे.
“यमराज तुमची वाट बघत असतील”
काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना परखड शब्दांत तंबी दिली होती. “उत्तर प्रदेशात जे महिलांविरोधात गुन्हे करतील, त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. यमराज त्यांना नेण्यासाठी त्यांची वाट पाहात असतील”, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांच्या काढलेल्या खरडपट्टीचीही चर्चा होऊ लागली आहे.