UP Dowry Death : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील सादतगंज भागात रविवारी एका २४ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले असून, कुटुंबीयांनी तिची हत्या आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी पीडितेच्या पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तिचा पतीदेखील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास ७.५ लाख फॉलोअर्स आहेत. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचा विवाह ९ डिसेंबर २०२५ रोजी लखनऊच्या सादतगंज भागात राहणाऱ्या सागर राजपूत याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती आणि इतर नातेवाईकांनी गाडीसह अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिचा वारंवार छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नादरम्यान त्यांनी ७ लाख रुपये रोख आणि इतर घरगुती वस्तू ‘भेट’ म्हणून दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
छळाबाबत कुटुंबीयांना दिली होती माहिती
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत मुलीने आपल्याला सांगितले होते, तसेच त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण अनेकदा लखनऊ येथील तिच्या सासरच्या घरी गेलो होतो, असा दावा पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी तिच्या पुतणीची हत्या केल्याचा आरोप करत पीडितेच्या काकांनी पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तक्रारीनुसार, लग्नानंतर मृत तरुणीचा पती आणि सासरच्या इतर सदस्यांकडून अधिक हुंडा आणि कारसाठी सातत्याने छळ केला जात होता. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी ३० मे रोजी तिला फासावर लटकवून तिची हत्या केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.” या प्रकरणातील आरोपींमध्ये पीडितेचे सासरे, दीर, नणंदा आणि चुलत सासू यांचा समावेश आहे.
तपास कार्य
पोलिसांनी घटनेची पाहणी करून इनक्वेस्ट (Inquest) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (सेंट्रल) जितेंद्र कुमार दुबे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. एडीसीपी दुबे म्हणाले, “तक्रारीच्या आधारे, सादतगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ८०(२) आणि ८५, तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत एफआयआर (FIR) नोंदवला आहे.” आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “उपलब्ध पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे एडीसीपी यांनी पुढे सांगितले.
त्विशा शर्मा प्रकरणाशी साधर्म्य
या नवीन प्रकरणाचे भोपाळमधील त्विशा शर्मा प्रकरणाशी काही प्रमाणात साधर्म्य आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवासी असलेल्या शर्मा यांचे डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळचे रहिवासी समर्थ सिंग यांच्याशी लग्न झाले होते. १२ मे रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर, तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.हे प्रकरण भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ अंतर्गत गंभीर आरोपांशी संबंधित आहे. भोपाळमधील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी या मृत्यू प्रकरणा संदर्भात माजी जिल्हा न्यायाधीश गिरिबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंग यांना २ जूनपर्यंत पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
