आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भाजपानं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार असल्याचं समजतंय. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काँग्रेस देखील भाजपाला सत्तेतून पायऊतार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या पार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्क्रीनिंग कमिटीची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याची घोषणा केली. या कमिटीचे अध्यक्ष राजस्थानचे जितेंद्र सिंह असतील. या व्यतिरिक्त, कमिटीमध्ये इतर दोन सदस्य आहेत, ज्यात हरियाणाचे दीपेंद्र हुडा आणि महाराष्ट्रातील मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय लल्लू आणि आराधना मिश्रा यांच्यासह सर्व सचिव उमेदवारांच्या निवडीसाठी स्क्रीनिंग करतील. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रियंका गांधी सातत्याने यूपीला भेट देत आहेत आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटत आहेत.

काँग्रेसने केली ‘प्रतिज्ञा यात्रा’ काढण्याची घोषणा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ करिता काँग्रेसने एक ‘प्रतिज्ञा यात्रा’ काढण्याची देखील घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्वसामान्य लोकांसोबतचा संपर्क अधिक वाढवण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हा तब्बल १२ हजार किलोमीटर इतका लांबचा प्रवास केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून या यात्रेला “काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा: हम वचन निभाएंगे” असं नाव देण्यात आलं आहे. ही यात्रा राज्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतून हा प्रवास करेल. त्यामुळे, उत्तर प्रदेश विधानसभेत यश मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसली आहे. ज्यात प्रियांका गांधी हा काँग्रेसचा चेहरा असतील.

अद्याप कोणाशीही युती करण्याचे संकेत नाहीत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्यावरील पहिला प्रोमो देखील प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रियंका गांधी यांचं वर्णन ‘उत्तर प्रदेशची आशा’ असं करण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेसने इथे अद्याप कोणत्याही मोठ्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मात्र, या निवडणुकीकरिता काँग्रेस एका छोट्या पक्षाशी हातमिळवणी करणार असल्याची शक्यता आहे.