उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारचं सीबीआयवर खूपच प्रेम आहे. सीबीआयही त्यांच्या हाताखाली काम करते. सध्या देशभरात अनेक चौकशा केल्या जातात. या चौकशांबरोबरच आता सीबीआयचीही चौकशी केली जावी, अशी मागणी करत सीबीआयच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली.

अखिलेश यांनी पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी बाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. भविष्यात समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक पोलीस ठाण्याला ख्रिसमस, ईद, दिवाळी, होळी आणि इतर सण साजरा करण्यासाठी किमान ५ लाख रूपये दिले जातील असे जाहीर केले.

केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. सीबीआयला हाताशी धरून देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, गुरूवारी ओरेया  येथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटायला जात असताना पोलिसांनी अखिलेश यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज असल्याची टीका त्यांनी केली होती. सत्य दाबले जात असून मी पोलिसांच्या भितीने गप्प बसणाऱ्यांपैकी नसल्याचे त्यांनी म्हटले होते. सत्य जनतेसमोर येण्यासाठी आम्ही संघर्ष करणार असल्याचे ते म्हणाले. पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारे विजय मिळवण्यासाठी योगी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ओरेया येथे भाजप व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.