उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील जिल्हा न्यायालयाने १८ महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या करणाऱ्या २८ वर्षीय विराज ऊर्फ जितेंद्र पाठक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने अवघ्या ४० दिवसांत निकाल दिला आहे. या गुन्ह्याचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते.

सीसीटीव्ही फुटेज ठरला महत्त्वाचा पुरावा

जितेंद्र पाठक उर्फ विराज याला गुरुवारी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. हत्येनंतर अवघ्या ४० दिवसांत हा निकाल लागला. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेले या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सरकारी वकिलांनी महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केले.

लग्नास नकार, मुलावर काढला राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय रती शर्मा हिने जितेंद्रचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. आपल्याला आधीच मुलगा असून त्याला सोडून जाणार नसल्याचे तिने स्पष्ट सांगितले होते. यानंतर आरोपीने त्या चिमुकल्यालाच आपल्या नात्यातील अडथळा मानून त्याचा निर्घृण खून केला.

चॉकलेटचे आमिष दाखवून निर्घृण हत्या

३० मे रोजी आरोपीने मुलाला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून घराबाहेर नेले. त्यानंतर ५० मीटर अंतरावर जाऊन निर्जन ठिकाणी त्याला वारंवार जमिनीवर आपटले. मुलाला जमिनीवर वारंवार आपटल्याचा आवाज परिसरातील नागरिकांना सुरुवातीला सिमेंटच्या गोण्या टाकल्यासारखा वाटला. मात्र, एका स्थानिक रहिवाशाने सीसीटीव्हीमध्ये प्रकार पाहताच बाहेर धाव घेतली. त्यानंतर आरोपीने जखमी मुलाला परत घराजवळ आणून तो पडल्याचा बनाव केला आणि तेथून पळ काढला. नंतर कुटुंबातील सदस्यांना तो मुलगा पडलेला आढळला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

सहा दिवसांत आरोपपत्र, ४० दिवसांत निकाल

या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर जलदगतीने सुनावणी पूर्ण झाली आणि हत्येनंतर ४० दिवसांत न्यायालयाने निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

आरोपीला विक्रमी वेळेत फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. मृत चिमुकल्याची आजी आणि या प्रकरणातील तक्रारदार अनुसुईया शर्मा म्हणाल्या की, ही शिक्षा प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत आमचा लढा सुरू राहील. तसेच जलद तपास पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.