उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणाऱ्यांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं आता अनिवार्य असणार आहे. योगी सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या राज्यात करोना रुग्णवाढीचा दर हा ३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच हा रिपोर्ट चार दिवस जुना असला तरच ग्राह्य धरला जाणार आहे. त्याचबरोबर करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना यातून सूट देण्यात आली आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ट्रेस, टेस्ट अँड ट्रीट करण्यावर जोर दिला. त्याचबरोबर करोनाबाधित राज्यातून उत्तर प्रदेशात आल्यानंतर करोना पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितलं आह. तसेच अँटिजेन टेस्ट आणि थर्मल स्कॅनिंग करण्यास सांगितलं आहे.

करोना रोखण्यासाठी देण्यात आलेल्या नियमावलीचं सक्तीनं पालन करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तिसरा लाटेचा धोका पाहता उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी कावड यात्रा रद्द केली आहे. पुढचे काही दिवस महत्त्वाचे असल्याने उत्तर प्रदेश सरकारनं आतापासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

ओवैसींच्या AIMIM पक्षांचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक; ‘या’ व्यक्तीचा लावला फोटो

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आयसीएमआर आणि इतर केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून देखील सातत्याने देशवासीयांना संभाव्य रुग्णवाढीसंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. लोकांकडून सातत्याने केलं जाणारं करोना नियमांचं उल्लंघन, मास्क वापरण्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि लोकांमध्ये आलेला निर्धास्तपणा या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.