Anandiben Patel Statement on love marriage controversy triggers: उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी प्रेमविवाह, लग्न करणारी जोडपी पळून जातात आणि मुलीची गर्भधारणा होते आणि मग त्यांची मुले सरकारच्या भरोशावर सोडली जातात. त्यांना कुणी स्वीकार करत नाहीत आणि मग अशी मुले बाल सुधार गृहात पोहोचतात. लखनौमधील एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेली टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी यावर टीकाही केली. याच कार्यक्रमात महिलांबाबत त्यांनी केलेली इतर विधानेही चर्चेत आहेत.

राज्यपाल आनंदीबेन पटेल काय म्हणाले?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठाच्या २४ व्या दीक्षांत समारंभात बोलताना पटेल यांनी प्रेमविवाह आणि तरुण-तरुणींच्या आयुष्यावर भाष्य केले. त्या म्हणाला, “माझा प्रेमविवाहाला विरोध नाही. परंतु त्यांनी तरुण मुलींना लग्नापूर्वी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. जेव्हा पालक मुलांच्या नात्याला मान्यता देत नाहीत. तेव्हा जोडपी पळून जाऊन लग्न करतात. त्यामुळे अनेकदा मुली शिक्षण घेत असतानाच गरोदर राहतात आणि मुलांना जन्म देतात.”

राज्यपाल आनंदीबेन पटेल पुढे म्हणाल्या, अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अनेकदा सरकारवर येते. उपस्थितांना आवाहन करताना आनंदीबेन पटेल म्हणाल्या की, हे तुमचे पराक्रम आहेत. असे पराक्रम करू नका.

आनंदीबेन पटेल यांनी स्वतःच्या मुलाचेही उदाहरण यावेळी दिले. त्या म्हणाल्या, “माझा मुलगा बंगळुरूमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मी त्याला म्हणाले की, जर तुला एखादी मुलगी पसंत पडली तर मला सांग. तुझे लग्न लावून देऊ. पण त्याने असे काही केले नाही. पण जर तुम्हाला कुणी पसंत पडले तर एक गोष्ट ध्यानात घ्या. आधी आत्मनिर्भर व्हा. मग लग्न करा.”

सोशल मीडियावरून टीका

राज्यपालाच्या विधानाचा सोशल मीडियावर मात्र समाचार घेतला जात आहे. अनेकांनी त्यांच्या विधानाचा आणि त्यांच्या भाषेचा विरोध केला. दीक्षांत सोहळ्यात बोलताना राज्यपालांनी अनुचित भाषेचा वापर केला, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. जिथे विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करायला हवा, त्या समारंभात राज्यपाल नको ते बोलत असल्याची टीकाही होत आहे.

मुलींनी IAS होण्याआधी चांगली आई बनावे

याच भाषणात आनंदीबेन पटेल पुढे म्हणाल्या, “आजकाल मुली लग्नानंतर जेव्हा सासरी जातात, तेव्हा यूट्यूबवर पाहून जेवण बनवतात. व्हिडीओ पाहून कच्चे-पक्के जेवण बनवतात. मग त्या सासूचे बोलणे खातात. त्यामुळेच मी महिलांना सांगते की, कमीत कमी जेवण बनवणे तर त्यांना आलेच पाहिजे. तुम्ही शिक्षक बना किंवा आयएएस अधिकारी बना. पण त्याआधी तुम्हाला चांगली आई बनावेच लागेल.”

राज्यपाल पटेल यांच्या याही विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांना त्यांचे विधान योग्य वाटत आहे. तर अनेकांनी ही पुरुषप्रधान मानसिकता असल्याची टीका केली.