UP Govt Job Rules Regime Change Update: उत्तर प्रदेशात शासकीय नोकऱ्यांसाठी चारित्र्य पडताळणीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. देशात किंवा राज्यात हिंसक मार्गाने सत्तांतर (रिजीम चेंज) घडवून आणण्याच्या आंदोलनात सहभाग आढळणाऱ्या उमेदवारांना शासकीय सेवेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, अशी तरतूद नव्या नियमावलीत करण्यात आली आहे. बांगलादेशातील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतातही अशाच प्रकारचे षड्यंत्र रचले जात असल्याचा इशारा दिला होता; त्यानंतर लगेचच हा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे.
नियुक्ती विभागाचे प्रधान सचिव एम. देवराज यांनी या संदर्भातील सुधारित आदेश जारी केले आहेत. हे नियम शासकीय विभाग, महामंडळे, मंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व थेट भरती प्रक्रियांसाठी लागू असणार आहेत.
हिंसेला थारा नाही
नव्या धोरणानुसार, हिंसेच्या माध्यमातून सत्ता उलथवून टाकण्याच्या कारवायांमध्ये सहभागी आढळल्यास उमेदवाराला सरकारी नोकरीसाठी बाद केले जाऊ शकते. मात्र केवळ एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचे असणे हे अपात्रतेचे कारण ठरणार नाही, असेही स्पष्ट करत सरकारने वैचारिक स्वातंत्र्य आणि हिंसक सहभाग यातील फरक अधोरेखित केला आहे.
याशिवाय, उमेदवारावर केवळ एफआयआर दाखल असणे किंवा तपास प्रलंबित असणे, या एकाच कारणावरून त्याला थेट अपात्र ठरवले जाणार नाही. आरोपांचे गांभीर्य आणि पडताळणी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल, असे सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांना ३० दिवसांची मुदत
भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी चारित्र्य पडताळणी अहवाल ३० दिवसांच्या आत सादर करण्याचे बंधन पोलीस प्रशासनावर घालण्यात आले आहे. केवळ पडताळणी प्रलंबित राहिली म्हणून नियुक्ती रखडू नये यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व स्व-घोषणापत्र घेऊन त्यांना तात्पुरते नियुक्तीपत्र दिले जाऊ शकते. मात्र पडताळणीत खोटी माहिती किंवा गैरकृत्य समोर आल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे सुधारित नियम केवळ थेट भरतीद्वारे नव्याने सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना लागू असतील; सेवेत आधीच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पडताळणीची आवश्यकता भासणार नाही.
यावर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “लोकशाहीत सत्तेचा मार्ग अराजकतेतून नव्हे, तर जनतेच्या कौलातून मिळतो. बांगलादेशच्या धर्तीवर भारतात सत्तांतराचे स्वप्न पाहणाऱ्या शक्ती तरुणांच्या हाती राष्ट्रनिर्माणाच्या मशालीऐवजी अराजकतेची हत्यारे देऊ पाहत आहेत. अशा कारवायांना लोकशाहीच्या बळावर हाणून पाडले जाईल.”
