Judge Ravi Kumar Diwakar: उत्तर प्रदेशातील न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी सोमवारी (७ सप्टेंबर) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केलेल्या काही गंभीर आणि खळबळजनक विधानांमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगार आणि माफियांच्या फायद्यासाठी त्यांच्याकडील गंभीर स्वरूपाचे खटले न्यायालयातून काढून घेण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे त्यांना खूप दुःख आणि वेदना झाल्याचे सांगत, भित्रा न्यायाधीश म्हणवून घेण्यापेक्षा मरणे पसंत करीन, असे ते म्हणाले. ‘लाईव्ह लॉ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, मुजफ्फरनगरचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी नदीम नावाच्या व्यक्तीला त्याची पत्नी शाहजादी हिची अमानुषपणे जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा गुन्हा अतिशय क्रूर आणि पाशवी असल्याचे स्पष्ट करत तो दुर्मिळातील दुर्मिळ प्रवर्गात मोडत असल्याचे नमूद केले. यावेळी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी, “माफिया, गुन्हेगार आणि गँगस्टर यांना वाचवण्यासाठीच हे खटले अन्यत्र वर्ग करण्यात आले”, असा दावा केला.
२२ जणांना फाशीची शिक्षा
याबाबतचे सर्व तपशील ठाऊक असल्याचेही दिवाकर यांनी सांगत, पदाचा मान ठेऊन या क्षणी सर्व बाबी उघड करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात न्यायाधीशांनी अवघ्या चार महिन्यांत १० वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या न्यायालयातील हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित ९७ प्रलंबित खटले काढून घेण्यात आले होते.
न्यायाधीश दिवाकर काय म्हणाले?
३८ पानांच्या या निकालामध्ये न्यायाधीशांनी आपल्या वैयक्तिक भावनाही सविस्तर मांडल्या आहेत. “माणूस जगाची फसवणूक करू शकतो, परंतु तो स्वतःच्या आत्म्याची फसवणूक करू शकत नाही”, असे दिवाकर म्हणाले. “ज्यांनी त्यांच्यासोबत असा गैरव्यवहार केला आहे, ते जेव्हा स्वतःच्या आत्म्याकडे पाहतील, तेव्हा ते स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीत”, असे दिवाकर म्हणाल्याचे ‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तात म्हटले आहे.
खटले काढून घेण्याच्या या कृत्यामागचा उद्देश माफियांना, गुन्हेगारांना आणि गँगस्टरना वाचवणे हाच होता, असा पुनरुच्चार त्यांनी केला. “उत्तर प्रदेशमधील पश्चिमेत मोठे माफिया आणि बाहुबली यांना जात आणि राजकीय संरक्षण लाभले असून त्यांचे जाळे खूप दूरवर पसरलेले आहे”, असेही न्यायाधीश दिवाकर यांनी नमूद केले.
भित्रा न्यायाधीश म्हणवून घेण्यापेक्षा मला मरणे पसंत करीन – न्यायाधीश दिवाकर
“आई-वडिलांनी आपल्याला लहानपणापासूनच देशाला व ईश्वराला घाबरायला शिकवले आहे, इतर कोणाला नाही”, असे न्यायाधीश म्हणाले. “बाहुबली, माफिया आणि गुन्हेगारांना घाबरू लागलो, तर न्यायाधीशांनी निष्पक्ष, निर्भय असावे आणि दबावाशिवाय कर्तव्य पार पाडावे, या जनतेच्या अपेक्षेच्या ते विरुद्ध होईल. भित्रा न्यायाधीश म्हणवून घेण्यापेक्षा मला मरणे पसंत आहे. माझ्या तत्त्वांचे पालन करू शकेन, तोपर्यंत मी सेवेत राहीन, अन्यथा मी राजीनामा देईन”, असे दिवाकर म्हणाले.
जिसकी लाठी उसकी भैंस
“माफियांचा प्रभाव वाढल्यास कायद्याचे राज्य संपुष्टात येऊन जिसकी लाठी उसकी भैंस नियम लागू होईल आणि लोकशाही पाया कमकुवत होईल”, असा इशारा त्यांनी दिला. “आज जगाला दानापेक्षा न्यायाची अधिक गरज आहे, न्यायाशिवाय स्वातंत्र्याला कोणताही अर्थ उरत नाही”, असेही दिवाकर यांनी स्पष्ट केले.
