UP LPG Tanker Accident : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. कानपूरहून वाराणसीच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान एलपीजी गॅस टँकरचे नियंत्रण सुटले आणि तो थेट टोल प्लाझावरील दुभाजकाला जाऊन धडकला. या धडकेनंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली आणि क्षणार्धात संपूर्ण परिसरात आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. ही संपूर्ण घटना टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत.
गॅस गळतीमुळे लागली भीषण आग
हा अपघात २६ जून रोजी सकाळी कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहोरी टोल प्लाझा येथे घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरचा वेग खूप जास्त होता. टोल प्लाझाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर वेगाने दुभाजकावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की, टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडू लागला आणि काही सेकंदांतच तिथे आगीचा प्रचंड गोळा तयार झाला. या आगीने संपूर्ण टोल प्लाझा परिसराला आपल्या कचाट्यात घेतले. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
४ जणांचा मृत्यू, २ जण रुग्णालयात
या भीषण दुर्घटनेत टँकर चालक धर्मेंद्र द्विवेदी रा. मिर्झापूर, यूपी हा केबिनमध्येच अडकून पडला. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की त्याला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. याशिवाय, तिथे कर्तव्यावर असलेले टोल प्लाझाचे ५ कर्मचारी आगीच्या ज्वालांमध्ये गंभीररीत्या भाजले. त्यांना तात्काळ प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी तिघांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आलोक सिंग या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी हिरामणी सिंग रा. रायबरेली आणि कृष्णपाल मौर्य रा. ललितपूर या आणखी दोन कर्मचाऱ्यांनी उपचारादरम्यान दम तोडला. रुग्णालयात अद्याप दोन कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरू
कोखराज पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रभूषण मौर्य त्यांनी सांगितले की, “या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ४ झाली असून, दोन जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.” याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा आणि गॅस टँकरच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
