Lakhimpur Kheri Viral Video shows a taxi driver hanging on a car bonnet for 4km at high speed: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. भारत-नेपाळ सीमेजवळ दोन टॅक्सी चालकांच्या वादातून एका चालकाने दुसऱ्याला चक्क कारच्या बोनेटवर लटकवून तब्बल चार किलोमीटरपर्यंत गाडी पळवली. विशेष म्हणजे, यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका प्रचंड होता. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून परिसरात खळबळ माजली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखीमपूर खेरीतील पालिया परिसरातील आहे. भारत-नेपाळ सीमेवर प्रवाशांना नेण्या-आणण्यावरून स्थानिक टॅक्सी चालक आणि बाहेरील टॅक्सी चालकांमध्ये अनेकदा वाद होत असतात. असाच एक वाद गुरुवारी टोकाला पोहोचला. लखनौहून एक टॅक्सी प्रवासी घेण्यासाठी सीमेवर आली होती. मात्र, स्थानिक टॅक्सी चालकांनी याला जोरदार विरोध केला. “बाहेरच्या गाड्यांना येथून प्रवासी नेण्याची परवानगी नाही,” असा दावा करत स्थानिकांनी ती टॅक्सी अडवण्याचा प्रयत्न केला.
या वादादरम्यान, स्थानिक टॅक्सी चालक रामबक्ष गुप्ता यांनी लखनौच्या टॅक्सीला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर उडी मारली. त्यांना वाटले की, बोनेटवर माणूस असल्याचे पाहून चालक गाडी थांबवेल. मात्र, लखनौच्या चालकाने गाडी थांबवण्याऐवजी रागाच्या भरात वेग वाढवला आणि गुप्ता बोनेटवर असतानाच गाडी सुसाट पळवायला सुरुवात केली.
४ किलोमीटरपर्यंत मृत्यूशी झुंज
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य अत्यंत भयानक आहे. रामबक्ष गुप्ता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कारच्या वायपरला घट्ट धरून बोनेटवर लटकलेले दिसत आहेत. आरोपी चालकाने दया न दाखवता भरवस्तीतून आणि महामार्गावरून सुमारे ४ किलोमीटरपर्यंत गाडी ताशी १०० च्या वेगाने नेली. गुप्ता ओरडून गाडी थांबवण्याची विनंती करत होते, मात्र चालक गाडी थांबवायला तयार नव्हता.
मागे असलेल्या इतर टॅक्सी चालकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने आपल्या गाड्या त्या कारच्या मागे लावल्या. अखेर मोठ्या कष्टाने इतर चालकांनी त्या कारला घेरले आणि ती थांबवण्यास भाग पाडले. सुदैवाने, या जीवघेण्या प्रवासात रामबक्ष गुप्ता यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
गुप्ता यांनी सांगितली आपबिती
सुटका झाल्यानंतर रामबक्ष गुप्ता यांनी आपली आपबिती सांगितली. ते म्हणाले, “चालकाने गाडीचा वेग इतका वाढवला होता की मला वाटले आता माझा जीव जाणार. मी फक्त वायपरला घट्ट पकडून राहिलो होतो. जर हात सुटला असता, तर मी थेट गाडीखाली चिरडला गेलो असतो. तो चालक मला मारण्याच्याच उद्देशाने गाडी चालवत होता.”
पोलिसांची कारवाई
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. पालियाचे सर्कल ऑफिसर जितेंद्र सिंह परिहार यांनी सांगितले की, “आम्ही व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. प्रवाशांच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित चालकाविरुद्ध जीवघेणा हल्ला आणि रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.”
