UP Loco Pilot Viral Video: रजा वाढविण्यास नकार दिल्यानंतर वैतागलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला अक्षरश: कपडे उतरवून वरिष्ठ अधिकाऱ्याला मूळव्याधीचे ऑपरेशन दाखवावे लागले. लखनऊ, उत्तर प्रदेशमध्ये एका लोको पायलटला ऑपरेशननंतर त्रास होत असल्याचे अधिकाऱ्यासमोर सिद्ध करण्याची वेळ आली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रजा वाढविण्यास नकार
राजेश मीना असे या लोको पायलटचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी राजेश यांचे मूळव्याधीचे ऑपरेशन झाले. पण, जखम बरी न झाल्याने रजा वाढविण्याची केलेली राजेश यांची मागणी वरिष्ठांनी मान्य केली नाही. या प्रकरामुळे वैतागलेल्या राजेश यांनी अधिकाऱ्यासमोरच कपडे उतरवून ऑपरेशनची जखम बरी झाली नसल्याचा पुरावा दिला. रजेचा अर्ज वारंवार फेटाळला जात असल्याने वैतागलेल्या राजेश असे पाऊल उचलले असे त्यांचे सहकारी सांगतात.
व्हिडिओ व्हायरल
राजेश मीना वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पॅन्ट उतरवून मूळव्याधीच्या ऑपरेशन दाखवत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांचे वर्तन अमानवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अनेक दिवसांच्या त्रासानंतर ऑपरेशन
राजेश मीना गेल्या अनेक दिवसांपासून मूळव्याधीच्या त्रासाचा सामना करत आहेत. त्रासाला कंटाळून त्यांनी इंदूरमध्ये उपचार घेतले मात्र, त्यातून त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर लखनऊमध्ये त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. २२ फेब्रुवारीला त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी त्यांना रेल्वेकडून २२ ते २८ दरम्यान रजा मंजूर केली होती. पण, २८ तारखेनंतर देखील त्यांची जखम बरी न झाल्याने आणि त्रास होत असल्याने त्यांनी रजा वाढविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली.
सिक मेमोसाठी नकारानंतर संताप
राजेश मीना यांनी रजा वाढविण्यासाठी रेल्वेच्या आरोग्य विभागाकडे विनंती अर्ज केला. आरोग्य विभागाने राजेश यांना विश्रांतीची गरज असल्याचे मान्य केले पण, रजा वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून ‘सिक मेमो’ घेण्यास सांगितले. राजेश वैद्यकीय कागदपत्रं घेऊन मेमो घेण्यासाठी वरिष्ठांकडे आले पण, त्यांची मागणी नाकारण्यात आली. यानंतर वैतागलेल्या राजेश यांनी पॅन्ट उतरवत ऑपरेशन केल्याचा पुरावाच वरिष्ठांना दाखवला. दरम्यान, युनियनच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर राजेश मीना यांची वाढीव रजा मंजूर करण्यात आली.
