Husband Burns Wife Alive: चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीला खुर्चीला बांधून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या महिलेच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला; मात्र आगीचे रौद्ररूप पाहता शेजाऱ्यांना तिला वाचवण्यात अपयश आले. या भीषण घटनेनंतर आरोपी पती आपल्या दोन मुलांना घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

सोनम (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून सुखबीर सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुखबीर सिंह हा गेल्या दहा वर्षांपासून हरयाणातील हिस्सार येथे कामाला होता. कन्नौजमधील आपल्या गावातील एका व्यक्तीशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच कारणावरून तो दोन दिवसांपूर्वी गावी परतला होता. घरी आल्यापासून या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते.

बुधवारी रात्री सुरू झालेला हा वाद गुरुवारी सकाळपर्यंत विकोपाला गेला. गुरुवारी सकाळी घराबाहेर धूर निघताना दिसल्यानंतर आणि सोनमच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्यावर शेजारचे लोक जमा झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी पाणी टाकले, घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत संपूर्ण खोलीत आग पसरली होती. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, तोपर्यंत सोनमचा जळून मृत्यू झाला होता. घटनास्थळी खुर्चीवर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आणि नायलॉनची दोरी आढळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत पेट्रोलचा तीव्र वास येत होता तसेच अर्धवट जळालेली पेट्रोलची बाटलीही सापडली आहे. यावरून सोनमला आधी दोरीने खुर्चीला घट्ट बांधण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छिबरामऊ विभागाचे पोलीस उपअधीक्षक मयंक मिश्रा यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी वाद वाढल्यानंतर आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर आधीच आणून ठेवलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवले. ती मदतीसाठी ओरडत असतानाच आरोपी आपल्या लहान मुलगा आणि मुलीला धमकावून स्वतःबरोबर घेऊन पसार झाला. तो हरयाणाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गुरुवारी दुपारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सुखबीर आणि सोनम यांचा विवाह सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमसंबंधांनंतर झाला होता. हिस्सारमध्ये सतत होणाऱ्या कौटुंबिक वादांमुळे ती काही काळापूर्वी कन्नौज येथील सासरी राहण्यास आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.