करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी रांगा लागल्या होत्या. तसेच ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत होता. आता करोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्याही कमी झाली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ४५ वर्षीय अर्चना देवी यांनी १०० दिवसांनंतर करोनावर मात केली आहे. देशात सर्वात जास्त काळ अर्चना देवी यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अर्चना देवी यांना एप्रिल महिन्यात मेरठमधील लाला लाजपत राय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ३० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे २१ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अर्चना यांना आयसीयूत भरती करण्यात आलं. तसेच बीआयपीएपीवर ठेवण्यात आलं होतं. फुफ्फुस आणि हृदयासंदर्भातील आजारावर यातून देखरेख ठेवता येते. जवळपास दोन महिने त्यांच्यावर या सिस्टीमवर उपचार सुरु होते. या दरम्यानं त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १०० टक्के ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. त्यानंतर जूनमध्ये त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाली. त्यामुळे त्यांचे डोळे आणि त्याच्या आसपास बुरशी आली होती. तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी झाली होती. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि योग्य उपचार केले.

दहा राज्यात करोनाचा प्रकोप!; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

“मी माझ्या कुटुंबियांच्या प्रेमापोटी जिवंत आहे. मला एक दिवस असं वाटत होतं, की मला हे दु:ख सहन होत नाही. मात्र माझ्या मुलाच्या आवाजाने मला रोखलं. त्याच्या आवाजामुळे मी हिम्मत एकवटवली”, असं अर्चना सिंह यांनी सांगितलं. त्यांच्या मुलालाही हा प्रसंग सांगताना अश्रू अनावर झाले. “वॉर्डमध्ये रेज एकातरी रुग्णाचा मृत्यू व्हायचा. आम्हीही आशा सोडल्या होत्या. मात्र त्यांनी मृत्यूवर मात केली”, असं पुतीन कुमारनं सांगितंल.