उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह लखनऊ पदवीधर मतदारसंघात समाजवादी पक्षाने विजय मिळवला आहे. या पराभवानंतर योगी सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या एकूण ११ जागांवर पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपाने ६ तर समाजवादी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला. आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भाजपा आणि सपा दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जात होती.
राजभर नेमकं काय म्हणाले?
वाराणसी पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “जनतेने त्यांचा कौल दिला आहे. हा सुशिक्षित लोकांचा कौल असून आम्ही त्याचा स्वीकार करतो. मात्र, ही मते केवळ सुशिक्षित लोकांची आहेत, सर्वसामान्य जनतेची नव्हे. आगामी विधानसभा निवडणुकीत हेच सुशिक्षित मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत. तेव्हा केवळ सर्वसामान्य मतदारच मतदान केंद्रांवर दिसतील.” राजभर यांच्या या विधानामुळे भाजपाकडून पदवीधर मतदारांचा अपमान केला जात असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य काय म्हणाले?
या पराभवानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. जिथे समाजवादी पक्षाचा विजय व्हायला नको होता, तिथे ते जिंकले आहेत. या निकालांचे आम्ही आत्मपरीक्षण करू. आगामी निवडणुकांमध्ये भाजपा पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने विजय मिळवेल,” असे मौर्य यांनी लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
- वाराणसी पदवीधर मतदारसंघ: समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी ५५,०४६ मते मिळवून भाजपाचे उमेदवार केदारनाथ सिंह यांचा पराभव केला.
- लखनऊ पदवीधर मतदारसंघ: समाजवादी पक्षाच्या उमेदवार कांती सिंह यांनी ५१,१६८ मते मिळवत भाजपाचे उमेदवार अवनीश कुमार सिंह (३६,३१३ मते) यांचा पराभव केला. जिल्हा प्रशासनाने कांती सिंह यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले आहे.
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागांचा अंतिम निकाल
२३ ऑक्टोबर रोजी ११ जागांसाठी मतदान पार पडले होते. यात भाजपाने आग्रा पदवीधर, बरेली-मोरादाबाद शिक्षक, लखनऊ शिक्षक, मेरठ शिक्षक व पदवीधर आणि गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला.
दुसऱ्या बाजूला, समाजवादी पक्षाने अलाहाबाद-झाशी पदवीधर आणि वाराणसी व आग्रा-अलिगढ शिक्षक मतदारसंघात आधीच बाजी मारली होती. त्यानंतर वाराणसी आणि लखनऊ या दोन महत्त्वाच्या पदवीधर जागांवर विजय मिळवून ‘सपा’ने आपली एकूण जागांची संख्या ५ वर नेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळालेला हा विजय समाजवादी पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.
