Facebook Honeytrap : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आयुध निर्माण कारखान्यात (Ordnance Factory) काम करणाऱ्या एका व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय(ISI)साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) आग्रा येथून रविंद्र कुमार आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पाकिस्तानस्थित हँडलर्सना लष्करासंबंधी गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र कुमार हा फिरोजाबादमधील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करत होता आणि त्याच्याकडे काही संवेदनशिल कागदपत्र त्याच्याकडे होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अत्यंत गोपनीय अशी काही माहिती ज्यामध्ये डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, स्क्रिनिंग कमीटीची काही गोपनीय पत्रे, प्रलंबित मागण्यांची यादी आणि ड्रोन आणि गगनयान प्रोजेक्टबद्दलची माहिती आयएसआय (ISI)शी संबंधित महिलेला पुरवली.
फेसबुकवरून साधला संपर्क
गेल्या वर्षी नेहा शर्मा असल्याचे भासवून एका महिलेने रविंद्र याच्याशी संपर्क साधला होता. आपण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे सांगून देखील ती रविंद्र याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाली. तपासात उघड झाले की, दोघांमधील संभाषण लपवून ठेवण्यासाठी रविंद्र याने त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर चंदन स्टोअर कीपर २ म्हणून सेव्ह केला होता. तसेच त्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात त्या महिलेला गोपनीय कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान यूपी एटीएसला रविंद्र याच्या फोनमध्ये गोपनीय माहिती आढळून आली. ज्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आणि गोरखा रायफल रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या लॉजिस्टिक ड्रोन चाचण्यांबद्दलची गोपनीय माहितीचा समावेश होता.रविंद्र हा पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या थेट संपर्कात होता आणि भारतातील सुरक्षा प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती तो त्यांना पुरवत होता.
रविंद्र याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या आग्रा येथील सहकाऱ्यालाही अटक केली आहे. तसेच तपास यंत्रणांनी डिजीटल पुरवे जप्त केले आहेत. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट आणि गोपिनय कागदपत्रांचा समावेश आहे, तपासाचा भाग म्हणून ज्याचे सध्या विश्लेषण केले जात आहे.