लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्राला सुरूवात

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केली. त्यातच उत्तर प्रदेशातही काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून काँग्रेसमध्ये सध्या बदलाचे वारे सुरू झाले आहेत. त्यातच उत्तर प्रदेशातील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे. तसेच स्मृती इराणी यांनीदेखील राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केला. याचीच जबाबदारी घेत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीदेखील आपला राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सोपवला.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केली. त्यातच उत्तर प्रदेशातही काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यातच फत्तेपुर सिक्रीतून खुद्द राज बब्बर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाचे उमेदवार राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांचा 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. यापूर्वी राज बब्बर यांना मुरादाबादहून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यांनी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तर फत्तेपुर सिक्रीचे विद्यमान खासदार चौधरी बाबूलाल यांच्याऐवजी भाजपने राजकुमार चाहर यांना उमेदवारी दिली होती. यानंतर बाबूलाल यांनी याला विरोधही केला होता. तसेच यामुळे भाजपाचे नुकसान होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु निकाल भाजपाच्याच बाजूने लागले.

दरम्यान, यानंतर राज बब्बर यांनी ट्विटरवरून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसची कामगिरी निराशाजनक आहे. मी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकलो नसल्याचेही ते म्हणाले. राज बब्बर 1989 पासून राजकारणात सक्रीय आहेत. 1989 मध्ये त्यांनी व्हि.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 2008 पासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले होते.

राज बब्बर, योगेश मिश्रा यांच्यासह लोकसभा आणि विधानसभेतील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत ओदिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Up raj babbar sends resignation congress chief rahul gandhi lok sabha

ताज्या बातम्या