भाजपा येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय महासचिव स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय वरुण गांधी, संजीव बलियान आणि सत्यपाल सिंह यांची नावे देखील चर्चेत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या १० जागांसाठी येत्या १६ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि भाजपा काँटे कि टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सपा तीन उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, समाजवादी पार्टी तीन उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षीय बलाबल लक्षात घेता सपाला केवळ दोनच जागा जिंकता येतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. सपा राम गोपाल यादव यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार करत आहे. याशिवाय माजी आयएएस अधिकारी आलोक रंजन आणि सलीम इक्बाल यांची नावे देखील चर्चेत आहेत. सपा राज्यसभेसाठी जोमाने मैदानात उतरण्याची तयारी पक्षाकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदींना उमेदवारी?

सूत्रांच्या मतानुसार, भाजपाला सात जागा निश्चित जिंकण्याबाबत आत्मविश्वास आहे. पण, आगामी विधानसभा निवडणुक विचारात घेता, पक्ष आठ जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल. पक्षाकडून क्रॉस व्होटिंग पर्याय विचारात घेतला जात आहे. भाजपा राष्ट्रीय महासचिव स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदी यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. याशिवाय पक्षाकडून जाट, राजपूत, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक उमेदवारांना देखील संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्याचे ओबीसी खासदार गीता शाक्य आणि बीएल वर्मा यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे.

पुरींना पुन्हा संधी?

वर्मा केंद्रात मंत्री असून, त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली जाईल. भाजपा ओबीसी मोर्चा राज्याचे अध्यक्ष प्रकाश पाल आणि रेखा वर्मा यांच्या नावांची देखील चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा देखील राज्यसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे. पंजाबमधील आगामी निवडणुका लक्षात घेता पुरी यांना पुन्हा राज्यभेवर घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.