उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) २ शेतकऱ्यांना अटक केली आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या शेतकऱ्यांची नावं कमलजीत सिंग (२९ वर्षे) आणि कंवलजीत सिंग उर्फ सोनू (३५ वर्षे) अशी आहेत. आतापर्यंत भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी एकूण ६ जणांची अटक झाली आहे. तसेच एकूणच लखीमपूर खेरी प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसआयटीने याआधी स्थानिकांकडून माहिती मिळावी म्हणून या प्रकरणातील संशयित आरोपींचे फोटो भिंतींवर चिकटवले होते. त्यात या दोन शेतकऱ्यांचे फोटो देखील होते. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नव्हती. याआधी विचित्र सिंग, गुरविंदर सिंग, अवतार सिंग, रंजित सिंग यांना अटक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी भाजपाचे नेते आणि मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासोबत सहआरोपी असलेल्या सुमित जयस्वालच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं ‘पूर्वनियोजित कट’, SIT चा गंभीर खुलासा

दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं हा विचारपूर्वक केलेल्या नियोजित कटाचा भाग होता, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) म्हटलं होतं. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्‍य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली होती. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं होतं. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न (attempt to murder) आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली होती.

लखीमपूर खेरी हत्याकांडाचं नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना मागून येऊन गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. लखीमपूरमधील या घटनेत ४ शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय.

हेही वाचा : “खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून प्रयत्न”, सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं

महिंद्रा थार गाडीसह एकूण ३ गाड्यांच्या ताफ्यानं शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित शेतकरी संतापले. त्यांनी ज्या गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंत्री अजय मिश्रा यांच्या महिंद्रा थार गाडीचा चालक आणि २ भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

More Stories onलखीमपूर
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up sit arrest two farmers in killing of bjp worker in lakhimpur kheri amid protest pbs
First published on: 02-01-2022 at 19:11 IST