Dating App Fraud UP Woman Sextortion : डेटिंग अॅपवर पुरुषांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आलाय. पुरुषांच्या खासगी छायाचित्र आणि व्हिडिओंचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचं समोर आलंय. उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये पल्लवी सिंह राजपूत नावाच्या महिलेवर आरोप आहे.
ब्लॅकमेल करत ६ कोटी रुपये उकळले
तक्रार आणि पीडितांच्या दाव्यानुसार, हे संभाषण आधी मैत्रीने सुरू व्हायचं आणि नंतर त्याचं रुपांतर जवळच्या संबंधांमध्ये व्हायचं. यानंतर भेटीदरम्यान पुरुषांचे फोटो किंवा व्हिडिओ काढले जात असत आणि याच फोटोंचा व व्हिडिओंचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं. तक्रारदाराच्या आरोपानुसार, पीडितांकडून ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळण्यात आली आहे. पैसे न दिल्यास पुरुषांना बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात होती. परंतु, या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पाच जणांना तुरुंगातही जावं लागलं आहे. पीडित पुरुषांचं म्हणणे आहे की, कायदेशीर कारवाईची धमकी देत लोकांकडून पैसे उकळले जात होते. या प्रकरणाशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये बेडवर नोटांचं मोठं बंडल रचलेलं दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये एक महिला हातात शस्त्र धरलेली दिसत आहे. मात्र, त्यांचं मूळ, तारीख आणि संदर्भ अद्याप स्वतंत्रपणे स्पष्ट झालेले नाहीत.
दुसऱ्या एका तक्रारीनुसार, ही महिला नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी सोशल मीडिया अकाउंट्स चालवत किंवा वापरत असे. यामध्ये स्विटी तिवारी या नावाचा उल्लेख आहे. या कामात पल्लवी सिंह राजपूतला इतर दोन महिला आणि दोन पुरुषांनी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
