Forced Conversion Case UP: नाशिक जिल्ह्यात टीसीएस कंपनीतील धर्मांतराशी संबंधित प्रकरण गाजत असतानाच आता उत्तर प्रदेशमध्येही एक ताजी घटना समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात धर्मांतराच्या आडून मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी फिजिओथेरपिस्ट आणि जिम ट्रेनर चांदणी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांना धर्मांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत अटक केली. ३० वर्षीय आयुष मलिकचे धर्मांतर करून मोहम्मद अली केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान मोहम्मद अलीने सविस्तर प्रतिक्रिया दिली असून आपली बाजू मांडली. व्हिडीओ खाली दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमधील व्यावसायिक देवराज मलिक यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. देवराज मलिक यांनी आरोप केला की, त्यांचा मुलगा आयुष मलिकने धर्म, ओळख बदलावी, कुटुंबापासून दूर व्हावे, यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात होता. कौटुंबिक मालमत्तेवर डोळा ठेवून आणि ती ताब्यात घेण्यासाठी हा कट रचला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज सिंह मलिक यांनी शामली येथे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चांदणी आणि तिच्या वडिलांची अटक केली. देवराज मलिक यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा बी-फार्मामधून पदवीधर झाला आहे. तो शहरात मेडिकल दुकान चालवतो. काही वर्षांपूर्वी तो चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने स्वतःची ओळख आणि धर्म बदलला.

एफआयआरमधील माहितीनुसार, आयुष मलिक २०१८ साली पहिल्यांदा चांदणी कुरेशीला भेटला. स्थानिक रुग्णालयात त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तिथे चांदणी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहत होती. उपचारा दरम्यान दोघांमध्ये ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आयुषच्या वडिलांनी आरोप केला की, चांदणी आणि तिच्या कुटुंबियांनी आयुषने इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी त्याच्यावर प्रभाव टाकला.

देवराज मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाला २०२३ साली दिल्लीला नेण्यात आले. तिथे त्याचे धर्मांतर करण्यात आले आणि त्याला मोहम्मद अली असे नवे नाव दिले. दिल्लीतच दोघांचा निकाह करण्यात आल्याचाही दावा देवराज मलिक यांनी केला. पोलिसांनी लग्न प्रमाणपत्र शोधण्यास सुरुवात केली असून असे प्रमाणपत्र सध्यातरी आढळलेले नाही.

आयुषकडून इस्लाम धर्माचे आचरण

पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष इस्लाम धर्माचे आचरण करत आहे. त्याने दाढी वाढवली असून तो दिवसातून पाच वेळा नमाजही अदा करतो. तसेच त्याने स्वतःचा पेहरावही बदलला आहे.

कोट्यवधींची मालमत्ता हडप करण्याचा कट?

देवराज मलिक यांनी पुढे आरोप केला की, त्यांच्या कुटुंबाची कोट्यवधींची मालमत्ता आहे. या मालमत्तेवर ताबा मिळविण्यासाठी कदाचित हा कट रचण्यात आला असावा. मुलाने धर्म बदलल्याचे लक्षात आल्यानंतर देवराज मलिक यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता आणि उत्तर प्रदेश धर्मांतर प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चांदणी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांच्यासह कुटुंबातील काही जणांना अटक केली आहे. तसेच आणखी दोन अज्ञात धर्मगुरुंचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.

आयुष मलिक काय म्हणाला? पाहा व्हिडीओ

इस्लाम धर्मापासून प्रेरित झालो – मोहम्मद अली

या विषयावरून वाद उफाळल्यानंतर आयुष आणि आताचा मोहम्मद अली माध्यमांसमोर आला. तो म्हणाला की, मी दोन वर्षांपासून इस्लाम धर्माचा अभ्यास करत होतो. जेव्हा इस्लाम धर्म पटला, तेव्हा मी तो स्वीकारला. मला जे वाटले ते मी केले, पण त्यावरून इतका वाद होईल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबीय या निर्णयावर नाखूष आहेत.

नाशिक TCS प्रकरणातही धक्कादायक माहिती समोर

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून नवी माहिती समोर आली आहे. पीडितेवर धर्मांतरासाठी संशयितांकडून दबाव टाकण्यात येत होता. त्यासाठी तिच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्माचे विशेष ॲपही डाऊनलोड करण्यात आले होते. पीडितेच्या मन परिवर्तनासाठी सातत्याने इस्लाम धर्माशी संबंधित चित्रफिती आणि फोटो पाठवण्यात येत होते. पीडितेला इस्लाम धर्माची पुस्तके वाचण्यास सांगण्यात येत होते. त्यासाठी तिच्यावर सक्ती करण्यात येत होती.

पीडितेची इच्छा नसतानाही तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडण्यात आले. एवढेच नव्हे तर, रोजा ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. संशयितांनी पीडितेचे ‘हनिया’ असे नामकरण केले होते. पीडितेने नमाजपठण करावे, यासाठी तिला भीती दाखविण्यात येत होती. पीडिता मानसिकरित्या खचावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले, असा उल्लेख आरोपपत्रात आहे.

एवढेच नव्हे तर, दानिश शेखने पीडितेचे लैंगिक शोषण करण्यासह तिची आर्थिकदृष्ट्या लुबाडणूकही केली. तिच्याकडून किमती वस्तू घेतल्या. पैसेही घेतले. तौफिक अत्तारने ऑफिसमध्येच पीडितेचा विनयभंग करुन तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. नाशिक पोलिसांपुढे अजून इतर गुन्ह्यांचेही दोषारोपपत्र सादर करण्याचे आव्हान आहे.