Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. आता या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. या पार्श्वभूमीवर बंगळूरू येथील एका व्यासपीठावर बोलताना भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मोठं भाष्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्यांवर हल्ला करताना नमाज पठणाची वेळ टाळली होती, असा खुलासा करत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भारताची संवेदनशीलता सांगितली आहे.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी काय म्हणाले?
“भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे काळजीपूर्वक विचार करून आणि वेळेचं नियोजन करून त्यानंतर राबवण्यात आलं”, असं उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. “तसेच दहशतवाद्यांवर हल्ला करताना भारताच्या जवानांनी नमाजच्यावेळी दहशतवादी तळांवर हल्ला करणं जाणीवपूर्वक टाळलं”, असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे.
"During Op Sindoor, we would not strike at a time when those on the other side were doing namaz prayers. Because sabka malik ek hain," says Army Chief Upendra Dwivedi pic.twitter.com/yoFeYdfCc6
— Shashank Mattoo (@MattooShashank) April 10, 2026
‘ऑपरेशन सिंदूर’च्याबाबत उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, “जेव्हा आम्ही हल्ला करण्याची तयारी करत होतो, तेव्हा वेळ दुपारी २ वाजता किंवा ४ वाजता अशी कोणतीही असू शकली असती. मात्र, सैन्याने काही विशिष्ट वेळी जाणीवपूर्वक हल्ला केला नाही. आम्ही हे सुनिश्चित केलं होतं की, जेव्हा पलीकडच्या बाजूचे लोक दहशतवादी छावण्यांमध्ये नमाज अदा करत असतील तेव्हा आम्ही कारवाई करणार नाही. सबका मालिक एक है (सर्वांसाठी एकच देव आहे) म्हणून आम्ही ती वेळ निवडली नाही”, असं उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, द्विवेदी यांनी या ऑपरेशन सिंदूरचं वर्णन भारताच्या लष्करी उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा असं केलं. ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर हे विविध क्षेत्रांमधील संयुक्ततेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी भारताचं सर्वात शक्तिशाली साधन होतं. मात्र, आपल्याला विविध क्षेत्रांचं एकत्रीकरण आणि संमिश्रण साधण्याची गरज आहे. तसेच या ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कराने या क्षेत्रात आपली क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पावलं उचलली आहेत”, असंही द्विवेदी यांनी सांगितलं.
