German Minister UPI Payment : भारतात सगळीकडे आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI द्वारे पैसे ट्रान्सफर केले जातात. पैसे देण्याचा आणि पैसे घेण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय बनला आहे. वाढत्या डिजिटलायझेशनमुळे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं सोप्प झालं आहे. भारतात अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये आता युपीआयद्वारे पैसे दिले जातात. दरम्यान, या भारतीय डिजिटल पेमेंट पद्धतीचा डंका जगभरात वाजत आहे. आता जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनी भारतातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवेचे कौतुक करत जे दिल्लीत दिसलं ते जर्मनीत शक्य नाही, असं म्हटलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी बोलताना भारताचं कौतुक केलं. तसेच मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनी सांगितलं की, “दोन वर्षांपूर्वी मी दिल्लीत मेट्रो ट्रेनने प्रवास केला होता आणि भारताची आधुनिकीकरणाची रणनीती किलोमीटर दर किलोमीटर समजून घेण्याबरोबरच अनेक गोष्टींचा अनुभवही घेतला होता. तेव्हा अनेक लोकांना युपीआयद्वारे रस्त्यावर फळे खरेदी करताना पाहिले होते. पण मला वाटतं की हे जर्मनीमध्ये अशक्य आहे”, असं बर्लिनमधील जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या वार्षिक राजदूतांच्या परिषदेत ॲनालेना बेरबॉक यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Muhammad Yunus : “आम्हाला भारताबरोबर चांगले संबंध हवेत, पण…”, मुहम्मद युनूस यांचं महत्वाचं विधान
ॲनालेना बेरबॉक यांनी असंही म्हटलं की, “गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी बेंगळुरूमधील एका मार्केटमध्ये युपीआय वापरून भाजीपाला खरेदी केला होता. हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले होते”. दरम्यान, तेव्हा भारतातील जर्मन दूतावासाने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
जयशंकर जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत
भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी त्यांच्या जर्मन समकक्ष ॲनालेना बेरबॉक यांच्याशी विस्तृत चर्चा केली आणि व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला.