Parliament Winter Session News Update: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक अनेक मुद्द्यांवर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे अशा नेतेमंडळींच्या भाषणांमुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्रमक चर्चा पाहायला मिळाली. आता दुसऱ्या आठवड्याची सुरुवातदेखील दोन्ही बाजूच्या नेत्यांची आक्रमक भूमिका आणि शून्य प्रहरात सभागृह तहकूब करण्याची वेळ या घडामोडींनी झाली. आणि याला कारणीभूत ठरली काँग्रेसच्या एका सभेतली घोषणाबाजी!

लोकसभेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या एका सभेतील घोषणाबाजीचा मुद्दा उपस्थित केला. या सभेत सदर घोषणाबाजीवेळी काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते उपस्थित होते, असा दावादेखील किरेन रिजिजू यांनी केला.

काय म्हणाले किरेन रिजिजू?

किरेन रिजिजू यांनी काँग्रेसनं माफी मागण्याची मागणी करतानाच रविवारी झालेल्या एका घोषणाबाजीचा संदर्भ दिला. “आम्ही या सभागृहाचे सदस्य आहोत. आम्ही एकमेकांचे विरोधी आहोत, शत्रू नाही. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाच्या एका खासदाराने विरोधकांबबाच चुकीचा शब्द वापरला होता. पंतप्रधानांनी तातडीने आपल्या खासदाराला माफी मागायला सांगितलं आणि त्या खासदारांनीदेखील माफी मागितली. पण काल काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान मोदींची कबर खोदण्याची भाषा बोलली गेली. ही या देशासाठी दु:खाची बाब आहे की काँग्रेस पक्ष अशा शब्दांचा वापर करत आहे”, असं किरेन रिजिजू म्हणाले.

“काँग्रेस पक्षाचे सर्व वरीष्ठ नेते त्या सभेला उपस्थित होते. या देशासाठी यापेक्षा लाजिरवाणी, यापेक्षा दुर्दैवी कुठली गोष्ट असू शकत नाही. देशाच्या १४० कोटी जनतेचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींची कबर खोदण्याचा उल्लेख काँग्रेसच्या सभेत केला गेला. माझी मागणी आहे की काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी या प्रकाराबद्दल लोकसभेच्या सदनाच्या माध्यमातून देशाची माफी मागायला हवी”, अशी मागणी किरेन रिजिजू यांनी यावेळी केली.

इथे पाहा लोकसभेत गोंधळ झाला तो प्रसंग!

किरेन रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित करताच दोन्ही बाजू्च्या नेत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ११ वाजता सुरू झालेलं कामकाज पाचव्याच मिनिटाला १२ वाजेपर्यंत आणि नंतर १२ वाजता सुरू झालेलं कामकाज पुढच्या काही मिनिटांमध्येच २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.

राज्यसभेतही झाला गोंधळ, इथे पाहा Video!

काँग्रेसच्या कोणत्या सभेत ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा?

रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरीष्ठ नेते उपस्थित होते. या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी “मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी”, “वोट चोर, गद्दी छोड” अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भातले काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही महिला कार्यकर्त्या या घोषणा देताना दिसत आहेत.