राज्यसभेत मंगळवारी निर्धारित कामकाज स्थगित करून, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी सभापतींकडून मान्य न करण्यात आल्याने काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, राजद, द्रमुक इत्यादी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला.

या विरोधी पक्षांनी तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली होती. मात्र, सभापती व्यकंय्या नायडू यांनी ही मागणी अमान्य केली. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात उद्या चर्चा होईल, तेव्हा शेतकरी आंदोलनावर सदस्य आपले मुद्दे मांडू शकतात, असे सांगितले.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती नायडू यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेसाठी त्यांना नियम २६७ अंतर्गत विरोधी नेते गुलामनबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदु शेखर राय, द्रमुकचे तिरूची शिवा, डाव्या पक्षाच ई करीम आणि विनय विश्वमसह अनेक सदस्यांची नोटीस मिळाली आहे. नायडू यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरूवातीस केलेल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज चर्चा सुरू होईल आणि वरिष्ठ सभागृहात ही चर्चा उद्या(बुधवार) होईल. विरोधा पक्षांच्या सदस्यांची मागणी अमान्य करत, उद्या राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी सदस्य आपले म्हणणे मांडू शकतात. शेतकरी व सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत. असे यावळे सभापती नायडू यांनी सांगितले.

आणखी वाचा- “एवढे मोठे खिळे चीनच्या बॉर्डरवर लावले असते तर…,” संजय राऊत संतापले

यावेळी गुलामनबी आझाद यांनी म्हटले की, दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या मुद्यावर चर्चा करण्याची गरज आहे. तृणमूल काँग्रेसचे सुखेंद्र शेखर राय यांनी म्हटले की सरकार आणि शेतकरी यांच्यात काय सरू आहे, हे सभागृहाला माहिती नाही. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी अन्य मुद्दे देखील समोर येतील. मात्र, शेतकऱ्यांच्या मुद्यावर स्वतंत्र चर्चा करण्याची गरज आहे. आम्ही विशेषकरून याच मुद्यावर चर्चा करू इच्छित आहोत. तर, माकपाचे करीम म्हणाले की, आंदोलनस्थळी कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले आहेत. त्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद केला गेला आहे. द्रमुकचे तिरूची शिवा म्हणाले, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ज्यावर तत्काळ चर्चा करण्याची गरज आहे. राजदचे मनोज झा, बसपाचे सतीश चंद्र मिश्र यांनी देखील चर्चेची मागणी केली. यावर सभापती नायडू यांनी सांगितले की, सदस्यांची भावना व चिंता समजते आहे. या मुद्यावर उद्या चर्चा करण्यासाठी तुम्हाला कुणी अडवत नाही. उद्या तुम्हाला पूर्ण संधी मिळेल. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चेसाठी दहा तास आणि बजटवरील चर्चेसाठी दहा तासांची वेळ ठरवण्यात आलेली आहे, या संधीचा फायदा घ्या.

मात्र, सभापतींनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेसाठी परवानगी न दिल्याने, यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राजद व डाव्या पक्षांनी सभात्याग केला.