संसदेत ‘पेगॅसस कोंडी’ कायम

केंद्राचा समन्वयाचा प्रयत्न अपयशी

केंद्राचा समन्वयाचा प्रयत्न अपयशी

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अनौपचारिक स्तरावर विरोधी पक्षांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे मंगळवारीदेखील ‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तहकुबी नाटय़ रंगले. ‘पेगॅसस’ प्रकरणावर संसदेत केंद्र सरकारने चर्चा करावी तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी विरोधकांनी एकत्रित मागणी केली. अन्यथा संसदेचे कामकाज होऊ  दिले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी दिले.

लोकसभा तसेच, राज्यसभा सातत्याने तहकूब झाल्यामुळे मंगळवारी कोणतेही कामकाज झालेले नाही. यासंदर्भात, सोमवारी रात्री तसेच, मंगळवारी सकाळीही विरोधकांशी केंद्र सरकारने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या महत्त्वाच्या सर्व मुद्दय़ांवर केंद्र सरकारची चर्चा करण्याची तसेच, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी आहे. संबंधित मुद्दय़ांवर विरोधी पक्षांनी चर्चेसाठी नोटीस द्यावी व लोकसभाध्यक्ष तसेच, राज्यसभेचे सभापती हे कोणत्या नियमांतर्गत चर्चा होऊ  शकते यावर निर्णय घेतील, असे राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. पेगॅसस प्रकरणावर दोन्ही सदनांत चर्चेसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या अनौपचारिक चर्चाना फारसा अर्थ नाही. केंद्राने सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन ‘पेगॅसस’वर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कधी चर्चा घेतली जाईल हे जाहीर करावे, असे राज्यसभेतील खासदार व काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले. संसदेचे अधिवेशन फक्त केंद्र सरकारने मांडलेली विधेयके संमत करण्यासाठी बोलावले जात नाही, देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीही असते. विरोधकांशी चर्चा करण्याची तयारी असल्याची खोटी आश्वासने देऊन केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय विरोधकांसमोर पर्याय उरलेला नाही, असे शर्मा यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले.

पेगॅसस व शेतीचा मुद्दा राज्यसभेत आम्ही (विरोधक) सातत्याने उपस्थित करत आहोत पण, केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार नाही. खुद्द इस्रायलमध्ये या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, फ्रान्समध्येही होत आहे. मग, इथे (भारतात) चौकशी का होत नाही? केंद्र सरकारला काय लपवायचे आहे? केंद्र सरकारने पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस तंत्रज्ञानाच्या वापराची परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुठलाही विषय लोकशाही पद्धतीने सोडवण्याची तयारी नसल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

काँग्रेसचा दुटप्पीपणा   उघड करा : मोदी 

केंद्र सरकार विरोधकांशी संवाद साधत असल्याचा दावा करत असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना विरोधकांचा कथित खोटेपणा उघड करण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार असतानाही विरोधक संसदेच्या कामकाजात अडथळे आणत आहेत, हे वास्तव लोकांपुढे मांडा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला संपणार असून त्यानंतर भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघात विरोधी पक्षांचा विशेषत: काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड करावा, असे मोदींनी खासदारांना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uproar over pegasus continues in parliament zws