Anti Conversion Law: महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक

धर्मांतर विधीनंतर मुलाची तब्येत बिघडल्याने समोर आली घटना… आरोपी रिक्षाचालक असून, दुसऱ्या गावातून महिलेला घेऊन आला होता

love jihad, UP’s anti-conversion law
धर्मांतर विधीनंतर मुलाची तब्येत बिघडल्याने समोर आली घटना… आरोपी रिक्षाचालक असून, दुसऱ्या गावातून महिलेला घेऊन आला होता.

महिलेचं धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही महिला उत्तराखंडमधील असल्याचं समोर आलं असून, तीन जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. धर्मांतर करण्याच्या घटना वाढल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतर विरोधी कायदा लागू केला होता. या कायद्याखाली तिघांवर कारवाई रविवारी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक संसार सिंग यांनी य़ा घटनेबद्दलची माहिती दिली. धर्मांतर करण्यात आलेली महिला मूळची उत्तराखंडमधील आहे. प्रलोभन देऊन महिलेचं शहाबाद गावात धर्मांतर करण्यात आलं. महिलेच्या पतीचं निधन झाल्यानंतर आरोपीने तिला दुसऱ्या गावातून शहाबादमध्ये आणलं होतं. आरोपी रिक्षाचालक असून, महिलेच्या नवऱ्याचा मित्र असल्याचं सांगायचा.

धर्मांतर विधीनंतर महिलेच्या एका मुलाची प्रकृती बघिडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी धर्मांतरविरोधी अध्यादेश काढला. या कायद्यात आरोपीला एक ते पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असून, १५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ups anti conversion law 3 arrested yogi government uttar pradesh police bmh