UPSC Aspirant Letter to CJI : दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याशिवाय दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही कोचिंग सेंटरसमोर आंदोलन करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, यापैकी एका विद्यार्थ्याने आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने दिल्लीत यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी नरकयातना भोगत असल्याचे म्हटलं आहे. दिल्लीतील राज्यकर्त्यांच्या हगर्जीपणामुळे ही समस्या टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अविनाश दुबे या विद्यार्थ्याने याप्रकरणी सरन्यायधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने दिल्लीतील राज्यकर्त्यांच्या हगर्जीपणामुळे राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगर भागात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या उद्भवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पाणी साचण्याच्या समस्येचं कायमस्वरुपी निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याची मागणीसुद्धा त्याने या पत्रात केली आहे. हेही वाचा - Delhi UPSC Student Deaths : कोचिंग सेंटरच्या तळघराचं गेट तोडणाऱ्या गाडी चालकासह आणखी पाच जणांना अटक; आतापर्यंत सात जणांवर कारवाई दिल्लीत आम्ही नरकयातना भोगतो आहे राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगर भागातील नाल्यांची सफाई होत नसल्याने पाणी साचण्याची समस्या उद्भवत आहे. हे पाणी लोकांच्या घरातदेखील शिरत आहे. आम्हाला या भागतून जाताना गुडघ्यावर पाण्यातून जावं लागतं. दिल्ली सरकार आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आम्ही नरकयातना भोगतो आहे, असे त्याने या पत्रात म्हटलं आहे. न्यायालयाने आमच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावं पुढे या पत्रात त्याने दिल्लीतील घटना अतिशय दुर्देवी असल्याचंही म्हटलं आहे. दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे मी विनंती करतो, की या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावे, तसेच आमच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावं, असे तो म्हणाला. हेही वाचा - Jagdeep Dhankhar : “ते गॅस चेंबरपेक्षा…”, दिल्लीतील IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींचा संताप; म्हणाले, “शिकवणी वर्गांचा धंदा…” आतापर्यंत सात जणांना अटक दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत सात जणांवर कारवाई करत त्यांच्या अटक करण्यात आली आहे. यामध्ये कोचिंग सेंटच्या मालकाचादेखील समावेश आहे. त्यांना आज दिल्लीत सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.