UPSC CSE Result 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ अंतिम निकाल जाहीर केला आहे. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे.
अनुज अग्निहोत्री देशात प्रथम
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच केंद्र सरकारच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ सेवांमध्ये केली जाणार आहे. या वर्षीच्या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजेश्वरी सुवे एम, तिसऱ्या क्रमांकावर आकांश धुल्ल, चौथ्या क्रमांकावर राघव झुनझुनवाला आणि पाचव्या क्रमांकावर ईशान भटनागर यांनी स्थान मिळवले आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३१७ सामान्य प्रवर्गातील, १०४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), ३०६ इतर मागासवर्गीय (OBC), १५८ अनुसूचित जाती (SC) आणि ७३ अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.
दोन उमेदवारांचे निकाल रोखून ठेवले
तसेच काही उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती (प्रोव्हिजनल) ठेवण्यात आली असून दोन उमेदवारांचा निकाल रोखून ठेवण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परीक्षेचे गुण आणि इतर तपशील निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा मानली जाते.
निवड झालेल्या उमेदवारांचे प्रमाण
- सामान्य प्रवर्ग: ३१७
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS): १०४
- इतर मागासवर्ग (OBC): ३०६
- अनुसूचित जाती (SC): १५८
- अनुसूचित जमाती (ST): ७३
