UPSC Result 2022 : यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे. आणि तात्पुरत्या निवडीसाठी ८० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे.

परीक्षार्थींचे गुण निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी जाहीर केले जातील. यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. यूपीएसी नागरी सेवा परीक्षा २०२१च्या भरतीद्वारे, आयएएस, एएफएस, आयपीएस आणि गट अ आणि गट ब ची ७४९ पदे भरली जातील.

दरम्यान, दिल्लीच्या श्रुती शर्माने अखिल भारतीय रँक (AIR १) मिळवला आहे. त्यानंतर यशाने आनंदित झालेल्या श्रुती शर्मा म्हणाल्या की, “यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विश्वास होता, परंतु गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळणे आश्चर्यकारक आहे.” श्रुती शर्मा यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे.

शर्मा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश घेतला होता. श्रुती शर्मा यांनी जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी येथे नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. शर्मा यांच्यासह एकूण २३ उमेदवार जामिया आरसीए मधून नागरी सेवा परीक्षेत पात्र झाले आहेत.

नागपूरमधील तीन उमेदवारांनी मारली बाजी

यामध्ये महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे.