UPSC CSE 2025 Final Result: शुक्रवारी (ता. ६ मार्च) रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालात ९५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात लेखी परीक्षा तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ६ मार्च रोजी अखेर ‘यूपीएससी’कडून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

“त्याग, चिकाटी आणि अथक परिश्रमाचे फळ”

‘यूपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेत अनुज अग्निहोत्री हा उमेदवार सर्वोच्च गुण प्राप्त करून देशात पहिली रँक मिळवली आहे. तर राजेश्वरी सुवे एम. आणि अकांश धुल्ल यांनी अनुक्रमे दुसरी आणि तिसरी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ९५८ उमेदवारांची नावे आणि त्यांच्या परीक्षा क्रमांकासह निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र उमेदवारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ” नागरी सेवा परीक्षा २०२५ ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. त्याग, चिकाटी आणि अथक परिश्रमामुळे तुम्ही या यशापर्यंत तुम्ही पोहचू शकला आहात. पुढे देशाची सेवा करण्यासाठी आणि नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा”

“हा खूप कठीण काळ…”

या परीक्षेत यश मिळवलेले उमेदवार आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि केंद्राच्या इतर गट अ व गट ब सेवांमध्ये नियुक्त केले जातात. ही देशातील सर्वोच्च प्राशासनिक अधिकारी निवडण्याची परीक्षा आहे. या परीक्षेसाठी देशातील लाखो उमेदवार अनेक वर्ष अथक प्रयत्न करत असतात. यात काही जण यशस्वी होतात तर काही जणांच्या हाती निराशा येते. या परीक्षेत अपयशी झालेल्या उमेदवारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते म्हणाले की, ज्या उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही त्यांच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. तुमच्या मोठ्या प्रवासातील हा एक टप्पा आहे. भविष्यातील परीक्षांमध्ये आणि राष्ट्रासाठी योगदान योगदान देण्याच्या अनेक मार्गांमध्ये भरपूर संधी तुमच्यासमोर आहेत. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा”

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये पहिल्या १० उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:

१. अनुज अग्निहोत्री
२. राजेश्वरी सुवे एम
३. आकांश धुल्ल
४. राघव झुनझुनवाला
५. ईशान भटनागर
६. झिनिया अरोरा
७. ए. आर. रजाह मोहैदीन
८. पक्षाल सेक्रेटरी
९. आस्था जैन
१०. उज्ज्वल प्रियंक