UPSC CSE Exam New Rule: केंद्रीय लोकसेवा आयोगाने यंदाच्या नागरी सेवा परीक्षा २०२६ मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. बुधवारी (४ फेब्रुवारी) रोजी यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२६ च्या पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये नागरी सेवा परीक्षेबद्दल काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सेवेमध्ये असताना वारंवार नागरी सेवा परीक्षा देण्याची संधी बंद केली आहे. आता जर एखाद्या उमेदवाराची आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि आयएफएस (IFS) म्हणून नियुक्ती झाली असेल तर ते उमेदवार पुन्हा वारंवार परीक्षा देऊ शकणार नाहीत. तसेच सरकारी नोकरीची तयारी करणारे उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याचे अधिसूचना पाहू शकतात. आयोगाने केलेले नवे बदल सात मुद्द्यांद्वारे समजून घ्या.
१. फक्त एकदाच संधी
जे उमेदवार २०२५ च्या किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षेत पास होऊन सेवेत असेल तर त्याला २०२६ किंवा २०२७ या वर्षाच्या नागरी सेवा परीक्षेस बसता येणार आहे. ही संधी फक्त एकदाच मिळणार आहे, जेणेकरून ते इतर पात्रता निकष पूर्ण करू शकतील आणि त्यांना सेवेतून राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. जर २०२८ ची नागरी सेवा परीक्षा द्यायची असेल तर उमेदवाराला नियुक्त सेवेतून राजीनामा द्यावा लागणार आहे.
२. कोणते उमेदवार पात्र नसणार?
‘यूपीएससी’ने आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. हा बदल परीक्षेतील प्रयत्नांशी (Attempts) संबंधित आहे. नव्या नियमानुसार, मागील निकालात भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मध्ये नियुक्ती झालेला आणि त्या सेवेचा सदस्य राहिलेला उमेदवार २०२६ च्या नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination) देण्यासाठी पात्र राहणार नाही.
३. मुख्य परीक्षा देता येणार नाही
जर असा कोणताही उमेदवार (IAS, IFS), जो सेवेत असताना नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो यूपीएससीच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र असणार नाही. जरी त्याने २०२६ ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी त्याला मुख्य परीक्षा देता येणार नाही.
४. …तर कोणत्याही सेवेसाठी विचार केला जाणार नाही
जर एखाद्या उमेदवाराची नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ सुरू झाल्यानंतर, पण आयोगाकडून अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच आयएएस (IAS) किंवा आयएफएस (IFS) मध्ये नियुक्ती झाली आणि तो उमेदवार त्या सेवेचा सदस्य म्हणून कार्यरत राहिला, तर अशा उमेदवाराचा नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२६ च्या निकालाच्या आधारे इतर कोणत्याही सेवा किंवा पदासाठी नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही.
५. आयपीएस उमेदवारांसाठी महत्त्वाचा बदल
मागील नागरी सेवा परीक्षेच्या आधारे भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये आधीच निवड किंवा नियुक्ती झालेल्या उमेदवाराला नागरी सेवा परीक्षा २०२६ च्या निकालाच्या आधारे पुन्हा भारतीय पोलीस सेवेत निवड होण्यासाठी किंवा त्या सेवेत सामील होण्यासाठी पात्र मानले जाणार नाही.
६. दोन्ही निवडी रद्द होऊ शकतात
जर एखाद्या उमेदवाराने सीएसई-२०२६ किंवा सीएसई-२०२७ च्या आधारे मिळालेल्या सेवेसाठी आवश्यक प्रशिक्षणाला उपस्थिती लावली नाही, तर त्या उमेदवाराचे दोन्ही सेवांसाठी झालेले वाटप रद्द केले जाईल.
७. तिसऱ्यांदा अर्ज करण्यापूर्वी राजीनामा आवश्यक
पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना तिसऱ्यांदा नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. मात्र, जर त्यांना CSE-२०२८ किंवा त्यानंतरच्या कोणत्याही नागरी सेवा परीक्षेला बसायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या सध्याच्या सेवेतून आधी राजीनामा देणे अनिवार्य असेल.

